रत्नागिरीचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत
By Admin | Updated: September 26, 2014 23:29 IST2014-09-26T23:12:29+5:302014-09-26T23:29:14+5:30
राष्ट्रवादीला धक्का : रत्नागिरीतून लढणार

रत्नागिरीचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे रत्नागिरीचे आमदार असलेले व गेल्या वर्षभरापासून जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत असलेले उदय सामंत यांनी अखेर आज, शुक्रवारी राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ केला. राष्ट्रवादीतील अंंतर्गत वाद व लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली राज्यातील राजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकिटावर ते रत्नागिरीतून निवडणूक लढविणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. सामंत यांच्या निर्णयाने रत्नागिरीत राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेपासूनच उदय सामंत कार्यरत होते. त्यांच्याकडे प्रथम पक्षाच्या युवक जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर २००४ मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना विधानसभेची रत्नागिरीची उमेदवारी दिली.
रत्नागिरीतून भाजप उमेदवार बाळ माने यांचा पराभव करून ते निवडून आले. त्यानंतर त्यांच्या विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांची दखल घेत पक्षाने त्यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या सोपविल्या. २००९ मध्ये ते पुन्हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यावेळी त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्नही केले. मात्र, राज्यस्तरीय पक्षीय गटबाजीत त्यांना मंत्रिपद मिळणे कठीण बनले होते. पुनर्वसन म्हणून त्यांना युवक प्रदेशाध्यक्ष करण्यात आले.
सामंत यांच्यानंतर काही वर्षांनी सेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या चिपळूणमधील भास्कर जाधव यांना मंत्रिपद मिळाले. मात्र, आपणास डावलले गेल्याचे शल्य त्यांच्या मनात बोचत राहिले. त्यातून जिल्ह्यात जाधव विरुद्ध सामंत अशी गटबाजी रंगली. आपल्याला नाहक त्रास दिला जात असल्याची भावना सामंत यांच्या मनात निर्माण झाली. त्यातच मंत्रिपदही मिळत नव्हते. त्यामुळे नाराज झालेल्या सामंत यांनी तेव्हापासूनच शिवसेनेतील त्यांचे मित्र राजन साळवी यांच्या माध्यमातून सेनेशी जवळीक साधण्यास सुरुवात केली होती.
मातोश्रीवर जाऊन आल्याच्या वृत्ताचा सामंत इन्कार करत राहिले. आपल्या पराभवासाठी पक्षातीलच काहीजण जोराचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी नुकताच केला होता. सामंत यांची पक्षात कोंडी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांचे समर्थकही करीत होते. त्यातच राज्यात आघाडी व युतीही तुटली. त्यामुळे या संधीचा लाभ घेत व पक्षांतर्गत विरोधकांना धक्का देत सामंत यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. (प्रतिनिधी)