पालकमंत्र्यांनीही फिरविली पाठ

By Admin | Updated: August 5, 2016 02:28 IST2016-08-05T02:28:23+5:302016-08-05T02:28:23+5:30

सायन - पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

The Guardian also revised the text | पालकमंत्र्यांनीही फिरविली पाठ

पालकमंत्र्यांनीही फिरविली पाठ


नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. खड्ड्यांमुळे एक महिन्यापासून रोज चक्का जाम होत असल्याने प्रवासी व वाहतूकदार त्रस्त झाले आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याशी निगडित हा विषय असून त्यांनी याकडे दुर्र्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने १२२० कोटी रुपये खर्च करून सायन - पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केले. परंतु दोन वर्षामध्ये काँक्रीटीकरण वगळता उर्वरित सर्व रोडवर खड्डे पडले आहेत. वाशी ते नेरूळ दरम्यान रोज चक्का जाम होत आहे. पाच मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते एक तास लागत आहे. शासनाने छोट्या वाहनांना टोलमधून सूट दिल्यामुळे नुकसान होत असल्याचे कारण देवून ठेकेदार खड्डे बुजवत नाही. महामार्गावरील तुर्भे येथील पादचारी पुलाचे काम अर्धवट राहिले आहे. नेरूळ, जुईनगर भुयारी मार्गाचे कामही पूर्ण झालेले नाही. कामोठेमध्ये रुंदीकरणाचे कामही पूर्ण झालेले नाही. महामार्गाची पूर्ण चाळण झाली आहे. एक महिन्यापासून रोज वाहतूक कोंडी होत आहे. बुधवारी कोपरखैरणेमधून बेलापूरला जाण्यासाठी एका प्रवाशास २ तास १८ मिनिट वेळ लागला. सानपाडा ते जुईनगरपर्यंत जाण्यासाठी अर्धा ते एक तास लागत आहे. महामार्गावर रोज अपघात होत आहेत. रिक्षा, बसेस व इतर वाहनांचे खड्ड्यांमुळे प्रचंड नुकसान होवू लागले आहे. सकाळी कार्यालयांमध्ये जाताना व सायंकाळी परत येणाऱ्या नागरिकांना रोडमध्येच अडकून पडावे लागत आहे. कार्यालयामध्ये जाण्यासाठी वेळ होत असल्याने अनेकांनी बसने प्रवास बंद केला आहे. स्वत:चे वाहन वापरण्याचे बंद करून रेल्वेने जाणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच सार्वजनिक बांधकाम खाते आहे. महामार्गाचे रुंदीकरण त्यांच्या अखत्यारीत नसले तरी या मार्गावरील अनेक पूल एमएसआरडीसी ने बांधले असून ते त्यांच्या अखत्यारीत आहेत. रोज जवळपास दहा लाख प्रवासी सायन - पनवेल महामार्गावरून प्रवास करत आहेत. नवी मुंबई शहर, ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत, जेएनपीटी, तळोजा एमआयडीसी व ठाणेकडे जाणारी वाहनेही महामार्गावरूनच जात असतात. (प्रतिनिधी)
>आजी - माजी पालकमंत्र्यांच्या कामाची तुलना झाली सुरू
महामार्गावरील खड्ड्यांवरून ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे व माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या कामाची तुलना होवू लागली आहे. २००५ मध्ये ठाणे- बेलापूर रोडवरील प्रचंड खड्ड्यांमुळे नाईक यांच्यावर शिवसेनेसह काँगे्रसने टीकेची झोड उठविली होती. प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नाईक यांनी पालिकेच्या माध्यमातून पूर्ण ठाणे - बेलापूर रोडचे काँक्रीटीकरण करून खड्ड्यांचा विषयच संपविला. याशिवाय एमआयडीसी व सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले आहे. याशिवाय जनता दरबारच्या माध्यमातून शहरवासीयांच्या समस्या ऐकून त्या सोडविल्या जात होत्या. परंतु शिंदे यांनी दोन वर्षांमध्ये एक जनता दरबार घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असतानाही महामार्ग खड्डेमुक्त करता आलेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

Web Title: The Guardian also revised the text

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.