डीपीएस शाळेच्या फीवाढीविरोधात पालक आक्रमक
By Admin | Updated: April 30, 2016 02:38 IST2016-04-30T02:38:19+5:302016-04-30T02:38:19+5:30
शासन निर्णयानुसार विनाअनुदानित शाळांना १५ टक्के फीवाढ करण्याची परवानगी दिली

डीपीएस शाळेच्या फीवाढीविरोधात पालक आक्रमक
नवी मुंबई : शासन निर्णयानुसार विनाअनुदानित शाळांना १५ टक्के फीवाढ करण्याची परवानगी दिली असून या नियमाचे उल्लंघन करून एनआरआय परिसरातील दिल्ली पब्लिक स्कूल प्रशासनाने १७ टक्के फीवाढ केली आहे. मागील वर्षी या शाळेने १३ टक्के वाढ केली असून या शैक्षणिक वर्षात मात्र मागील वर्षीच्या तलनेत ४ टक्के अधिक वाढ केली आहे. पालकांनी शाळा प्रशासनाच्या या लूटमारीला विरोध करून शुक्रवारी शाळेबाहेर तीव्र आंदोलन केले.
फी शुल्क नियंत्रण कायद्याच्या अधीन राहून फीवाढ करणे आवश्यक असून डीपीएस शाळा प्रशासन मात्र नियमांचे पालन न करता मनाजोगी फीवाढ केल्याची तक्रार पालकांनी केली आहे. पीटीएची परवानगी न घेता ही वाढ करण्यात आली असून शाळेवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. याआधीही शाळा प्रशासनाविरोधात पालकांनी आंदोलन केले होते मात्र त्यावेळी २६ एप्रिलपर्यंत फीवाढीसंदर्भात प्रशासनाच्या वतीने पालकांना उत्तर दिले जाणार होते. तीन दिवस उलटूनही उत्तर न आल्याने पालकांनी पुन्हा शाळेविरोधात आंदोलन केल्याची माहिती दिली. १००० हून अधिक पालकांनी या फीवाढीला विरोध केला असून ती रोखण्यात यावी अशी मागणी केली आहे. पीटीएच्या नियमांचे पालन न करता शाळा प्रशासन मनमानी करत असल्याने पालकांची लूट होत आहे. काही पालकांनी शाळा प्रशासनाला फीवाढीविरोधात जाब विचारला असता शिक्षकांची पगारवाढ करणे तसेच इतर काही कारणास्तव फीवाढ केल्याचे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक जे. मोहंती यांनी शाळेच्या व्यवस्थापन समितीसोबत बैठक घेऊन त्यानुसार शैक्षणिक शुल्कातील वाढ ठरविण्यात आल्याचे सांगितले. या आंदोलनात उपस्थित पालकांनी शाळेविषयीची तक्रार मांडताना पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांकडूनही संगणक फी घेतली जात असून त्याचे प्रशिक्षण मात्र दिले जात नसल्याचे स्पष्ट केले. पालकांना लुबाडण्यात येत असून मातृभाषा मराठी असलेल्या मुलांना प्रवेशाकरिता डावलण्यात येत असल्याची व्यथा पालकांनी मांडली.
>नियमानुसार दोन वर्षात एकदा फीवाढ करता येत असून यासाठी देखील १५ टक्के इतकी मर्यादा आहे. डीपीएस प्रशासनाने मात्र मर्यादा तसेच नियमांचे पालन न करता वर्षभरातच १७ टक्के फीवाढ लागू केल्याने पालकांची लूट होत आहे. शाळा प्रशासनाने फीवाढीला स्थगिती दिली नाही तर कायदेशीर कारवाई केली जाऊन तोपर्यंत पालकांचे आंदोलन सुरूच राहणार आहे.
- दीपक पवार, नगरसेवक