गोंधळ घालत भाजपानेच ७ वर्ष रोखलं जीएसटी विधेयक - राहुल गांधी
By Admin | Updated: January 16, 2016 12:23 IST2016-01-16T12:20:43+5:302016-01-16T12:23:51+5:30
जीएसटी विधेयक काँग्रेसनेच प्रथम संसदेत आणले होते आणि भाजपाने त्यावरून गोंधळ घालत ते सात वर्ष अडवून ठेवलं अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली.

गोंधळ घालत भाजपानेच ७ वर्ष रोखलं जीएसटी विधेयक - राहुल गांधी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - बहुचर्चित जीएसटी विधेयक काँग्रेसनेच प्रथम संसदेत आणले होते आणि भाजपाने त्यावरून गोंधळ घालत ते सात वर्ष अडवून ठेवलं होतं, नरेंद्र मोदी आणि अरूण जेटलींनी ते पारित होऊ दिलं नव्हतं अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. दोन दिवसांच्या मुंबई दौ-यावर असलेल्या राहुल यांनी शनिवारी एनएमआयएमएस कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी मोकळेपणाने उत्तरं दिली.
काँग्रेसचा जीएसटी विधेयकाला विरोध नाही, भाजपामध्येच जीएसटीच्या मुद्यावर मतभेद आहेत. जीएसटीमुळे नागरिकांवर कराचा अधिक बोजा पडू नये असे आम्हाला वाटते. या विधेयकातील तीन मुद्यावरून आमच्यात व भाजपामध्ये मतभेद आहेत, पण आम्ही सांगितलेले बदल वा दुरूस्ती करण्यास भाजपाचा विरोध आहे, असे राहुल म्हणाले.
यावेळी त्यांनी असहिष्णूतेच्या मुद्यावरूनही सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारकडून सुरू करण्यात येणारी स्टार्टअप योजना आणि असहिष्णुता हे दोन्ही मुद्दे एकत्रपणे येऊ शकत नाही, असेही मत त्यांनी मांडले.