महाविद्यालयांच्या संख्येसोबत दर्जा वाढावा

By Admin | Updated: July 1, 2014 01:03 IST2014-07-01T01:03:57+5:302014-07-01T01:03:57+5:30

देशाच्या विकासात उच्चशिक्षणाचा महत्त्वाचा वाटा असतो. देशात अभियांत्रिकी संस्थांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हे चांगले संकेत आहे. परंतु त्यातुलनेत तांत्रिक बाबींमध्ये

Growth with the number of colleges | महाविद्यालयांच्या संख्येसोबत दर्जा वाढावा

महाविद्यालयांच्या संख्येसोबत दर्जा वाढावा

रघुनाथ शेवगावकर : रायसोनी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ साजरा
नागपूर : देशाच्या विकासात उच्चशिक्षणाचा महत्त्वाचा वाटा असतो. देशात अभियांत्रिकी संस्थांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हे चांगले संकेत आहे. परंतु त्यातुलनेत तांत्रिक बाबींमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताचा फारसा प्रभाव नाही. नवीन अभियांत्रिकी व विज्ञान महाविद्यालये सुरू होण्यासोबतच आवश्यकता असताना शिक्षणाच्या दर्जादेखील वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत ‘आयआयटी-दिल्ली’चे संचालक डॉ. रघुनाथ शेवगावकर यांनी व्यक्त केले. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पहिल्या पदवीदान समारंभादरम्यान ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
रायसोनी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ अणुवैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुप कुमार, रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी हे प्रामुख्याने उपस्थित होते. पदवी मिळाली म्हणजे विद्यार्थ्यांचे शिक्षण संपत नाही. उलट नवनवीन शिक्षणाची द्वारे उघडतात. अभियांत्रिकी आणि नाविन्यपूर्ण संशोधन या दोन्ही बाबी एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे महाविद्यालयांनी पारंपरिक कक्षेबाहेर जाऊन संशोधनाला प्रोत्साहन दिले पाहिजे, असा सल्ला डॉ. शेवगावकर यांनी दिला. डॉ. काकोडकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. भारत ‘पीपीपी’च्या (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) माध्यमातून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तरुणांची लोकसंख्या लक्षात घेता संशोधन, अभियांत्रिकी आणि तांत्रिक क्षमतेला वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्राध्यापकांनीदेखील विद्यार्थ्यांमध्ये जास्तीतजास्त आत्मविश्वास जागृत करण्यावर भर दिला पाहिजे, असे डॉ. काकोडकर म्हणाले. प्रभारी कुलगुरू अनुप कुमार यांनी पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पदवी मिळणे हा प्रत्येकासाठी गौरवाचा क्षण असतो आणि पुढील आयुष्यात पदवीचे सार्थक व्हावे यासाठी प्रयत्न करा, या शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. रासयोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी यांनी संस्थेची वाटचाल व प्रगतीविषयी माहिती दिली. संस्थेच्या संचालिका डॉ. प्रीती बजाज यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते अभियांत्रिकीतील स्नातक, स्नातकोत्तर अभ्यासक्रमांसोबतच ‘एमबीए’, ‘एमसीए’च्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Growth with the number of colleges