वार्षिक सकल उत्पादनात कृषी, पशूसंवर्धनाचा टक्का वाढतोय!

By Admin | Updated: January 21, 2017 02:55 IST2017-01-21T02:55:35+5:302017-01-21T02:55:35+5:30

अकोला येथे राज्यस्तरीय पशुचिकित्सालयीन अधिवेशन.

Growth in agriculture, animal conservation in annual gross production! | वार्षिक सकल उत्पादनात कृषी, पशूसंवर्धनाचा टक्का वाढतोय!

वार्षिक सकल उत्पादनात कृषी, पशूसंवर्धनाचा टक्का वाढतोय!

अकोला, दि. २0- देशाच्या दरडोई वार्षिक सकल उत्पादनात कृषी आणि पशूसंवर्धनाचा टक्का वाढत असून, या उत्पादनाकडे सरकार लक्ष ठेवून असल्याने उत्पादनाचा हा टक्का अधिक वाढविण्यासाठी या क्षेत्रातील संस्था जोमाने कामाला लागल्या आहेत. तसेच नवे संशोधन तंत्रज्ञान विकसित करू न शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यात येत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पशू व विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आदित्यकु मार मिश्रा यांनी शुक्रवारी केले.
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणार्‍या अकोला येथील स्नातकोत्तर पशूवैद्यक व पशूविज्ञान संस्थेच्यावतीने कृषी विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात शुक्रवारी एकदिवसीय अधिवेशन संपन्न झाले आहे. याप्रसंगी डॉ. मिश्रा बोलत होते.
अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी.दाणी यांनी केले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अदित्यकुमार मिश्रा होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. एन.पी.दक्षिणकार, विभागीय सहआयुक्त डॉ.पी.एस.चव्हाण, पीजीव्हाव्हीआयचे अधिष्ठात डॉ.हेमंत बिराडे, डॉ. सुनील वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मिश्रा यांनी कृषी व पशूसंवर्धन देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत असून, दरडोई वार्षिक सकल उत्पादनात (जाडीपी) कृषीचा २५ तर पशूसंवर्धनाचा ५ टक्के वाटा असल्याचे सांगितले. कृषीप्रधान देशात ही जमेची बाजू असल्याचे ते म्हणाले. विकासाच्या दृष्टीने विद्यापीठ जोमाने काम करीत असून, पशू व विद्यापीठांतर्गत पशू रुग्णालयात आधुनिक सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यामुळे जनावरांच्या आजाराचे निदान तंतोतत व तातडीने होणार आहे. शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना डोळ्य़ासमोर ठेवून संशोधन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ.दाणी यांनी शास्त्रज्ञांनी विकसित केलेले संशोधन व तंत्रज्ञान तळागळापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, तसेच संशोधन तंत्रज्ञानाचा अवलंब होणे गरजेचे आहे, तेव्हाच शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल, असे प्रतिपादन केले. आर्थिक विकासाच्या दृष्टिने महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या या क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. डॉ. दक्षिणकर यांनी या विषयावर विस्तृत विवेचन केले.
राज्यातील पहिल्या राज्यस्तरीय पशूचिकित्सालयीन अधिवेशनात औषधोपचार, शस्त्रक्रिया, प्रसूतिशास्त्र अंतर्गत उपचार केलेल्या विविध पाळीव व पशू रुग्णांचा उपचारात्मक अहवाल सादर करण्यात आला. दिवसभर चार तांत्रिक सत्र पार पडले. राज्यातील जवळपास २५0 शास्त्रज्ञ, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कर्नाटकहून विद्यार्थी, शास्त्रज्ञ उपस्थित होते. पशूविज्ञान विद्यापीठ व स्नातकोत्तर पशूवैद्यक व पशूविज्ञान संस्थेचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Growth in agriculture, animal conservation in annual gross production!