देशात वाढता असंतोष, बेकारी

By Admin | Updated: April 30, 2016 01:15 IST2016-04-30T01:15:22+5:302016-04-30T01:15:22+5:30

माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे. हा समाज सर्वांनी लायक ठेवला पाहिजे.

Growing dissent in the country, unemployment | देशात वाढता असंतोष, बेकारी

देशात वाढता असंतोष, बेकारी

पिंपरी : माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे. हा समाज सर्वांनी लायक ठेवला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आपण सर्व जण ही प्रतिज्ञा घेऊ. देशात असंतोष वाढत आहे. बेकारी वाढत चालली आहे. शिक्षण व आरोग्य महाग झाले आहे. याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास परिषद व लायन्स क्लब भोजापूर गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात श्रम-उद्योग परिषद आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आले. त्या वेळी वैद्य बोलत होते. निवृत्त कामगार आयुक्त टी. जी. चोळके, ऱ्मनोहर पारळकर, ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, बथुवेल बलिद, परशुराम बोऱ्हाडे, पी. के. सावंत आदी उपस्थित होते.
वैद्य म्हणाले, आंबेडकरांच्या विचारांचे चिंतन व मनन केले पाहिजे. वाढती बेकारी समाज गिळंकृत करेल. कारखाना मनुष्यविरहीत होऊ शकतो. माणसाचे जीवन महत्त्वाचे आहे. त्याचा विचार केला पाहिजे. कामगारांचे जीवन अवघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या जात आहेत. ही परिस्थिती बदलली पाहिजे. देशाच्या आर्थिक प्रगतीबरोबरच मानव विकास निर्देशांकही वाढला पाहिजे.
उपेक्षित कष्टकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. स्मशानभूमी सेवक सोना प्रधान, चर्मकार मधुकर वाघ, शवविच्छेदन मजूर सचिन घोलप, मोलकरीण संगीता साठे, रखवालदार धनसुख पटेल, बांधकाम मजूर रामकंवर जाधव, सफाई मजूर रंजना बालघरे, भाजीविक्रेते ठकाजी नरड यांना सन्मानित करण्यात आले. गिरीश प्रभुणे यांना दिनबंधू पुरस्कार, उद्योजक रामदास माने यांना राष्ट्रीय निर्मलग्राम मित्र पुरस्कार, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय घोडके यांना कर्मचारी हितसंवर्धन संघटना पुरस्कार देण्यात आला. राजेंद्र वाघ व दत्तात्रय तरटे यांना महाराष्ट्र श्रमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राजेंद्र वाघ यांनी कामगारांवर आधारित निर्भीड ही कविता सादर केली. प्रभुणे, पारळकर यांनी विचार व्यक्त केले. चोळके यांनी अध्यक्षीय भाषण केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. आभार परशुराम बोऱ्हाडे यांनी मानले. (प्रतिनिधी)
>श्रमाची चीज : भीती माहीत नाही
कार्यक्रमात कष्टकऱ्यांची प्रगट मुलाखत घेताना पुरुषोत्तम सदाफुले यांनी स्मशानभूमी सेवक सोनाबाई प्रधान यांना स्मशानात काम करताना तुम्हाला भीती वाटत नाही का? असा प्रश्न विचारला. त्या वेळी प्रधान म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत काम करीत आहे. भीती कुठे आहे, मला माहीत नाही. माझ्याकडून घडेल तेवढी मी सेवा करते. आज मिळालेल्या पुरस्काराने इतक्या वर्षांपासून काम केले, त्या कामाचे चीज झाले.’’

Web Title: Growing dissent in the country, unemployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.