तरुणांच्या गटाने बांधली आडोशी गावात विहीर
By Admin | Updated: June 10, 2016 03:19 IST2016-06-10T03:19:46+5:302016-06-10T03:19:46+5:30
आडोशी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डोंबिवलीच्या ‘जीवन परिस’ या तरुणांच्या ग्रुपने चौधरीपाड्यावर श्रमदान व लोकवर्गणीतून एक विहीर खोदली

तरुणांच्या गटाने बांधली आडोशी गावात विहीर
डोंबिवली : ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. मोखाडा तालुक्यातील आडोशी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डोंबिवलीच्या ‘जीवन परिस’ या तरुणांच्या ग्रुपने चौधरीपाड्यावर श्रमदान व लोकवर्गणीतून एक विहीर खोदली आहे. पर्यावरण दिनाचे औचित्यसाधून त्यांनी या विहिरीचे लोकार्पण केले. या विहिरीमुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी इतरत्र स्थलांतर करण्याची वेळ पुढच्या उन्हाळ्यात येणार नाही, असा दावा ग्रुपने केला आहे.
चार वर्षांपूर्वी ‘जीवन परिस’ हा ग्रुप स्थापन झाला आहे. सामाजिक कार्याच्या उद्देशाने डोंबिवलीतील सुशिक्षित आणि नोकरी करणारे तरुण या ग्रुपमध्ये एकत्रित आले आहेत. महाराष्ट्रातील चार वर्षांतील कोरड्या दुष्काळाचा, तेथील परिस्थितीचा त्यांनी अभ्यास केला. ठाणे जिल्ह्याशेजारी असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याचे त्यांना त्यात जाणवले. पाण्याअभावी दरवर्षी उन्हाळ्यात येथील गावपाडे विस्थापित होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मोखाडा तालुक्यातील आडोशी गावानजीक असलेल्या चौधरीपाड्यावर १४ घरे विखुरलेली आहेत. त्यात ७५ माणसे राहतात. खडकाळ जमीन आणि डोंगरउतारामुळे पावसाळ्यात सगळे पाणी वाहून जाते. नदीनाल्यांत खड्डे करून ग्रामस्थ उन्हाळ्यात आपली तहान भागवतात. या खड्ड्यांतील पाणीही टिकेल की नाही, याची शाश्वती नसते. त्यामुळे तेथे विहीर बांधण्याचे काम ‘जीवन परिस ग्रुप’ने हाती घेतले. त्यासाठी सहा लाख रुपये खर्च अपेक्षित होता. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे श्रमदान घेतले. लोकवर्गणी गोळा करण्याचे काम ग्रुपने केले. अवघ्या चार लाख रुपये खर्चात त्यांनी मोठी विहीर बांधली आहे. विहिरीच्या शेजारी शोषखड्डा घेण्यात आला आहे. त्यामुळे जमिनीत पाणी मुरेल व विहिरीतील पाण्याची पातळी उन्हाळ्यात आटणार नाही. परिणामी, ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळणार आहे. ही विहीर बांधण्यासाठी कंत्राटदार हबीब शेख यांनी त्यांची सगळी यंत्रसामग्री मोफत दिली होती, तर ५० जणांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला.
या उपक्रमात ग्रुपच्या वृषाली घाणेकर, मयूर दप्तदार, स्वानंद लेले, ज्योती मार्केंडे, तन्मय गोखले यांनी पुढाकार घेतला होता. विहीर बांधण्यासाठी स्थापत्य सल्लागार म्हणून ऋषिकेश लेले, कायदेशीर माहिती रीतू घरत, मुनिश मल्होत्रा, लक्ष्मण शिंदे यांनी दिली. प्रकल्प साकारत असताना ग्रामस्थांना विश्वासात घेण्याचे काम चिन्मया घाणेकर, ऋषिकेश पाठक यांनी केले. तसेच संपूर्ण प्रकल्पावर स्थानिक रहिवासी दिगंबर पाटील यांनी देखरेख ठेवली.
पहिलाच प्रयत्न यशस्वी : जीवन परिसचा हा पहिलाच प्रकल्प होता. तो त्यांनी यशस्वी केला. ५० जण एकत्रित आले, तर एका पाड्याची तहान भागू शकतो. त्याचप्रमाणे समाजातील लहानमोठे गट एकत्रित येऊन काम केल्यास राज्यातील जलसंकट दूर होण्यास मदत होऊ शकते, असा विश्वास ‘जीवन परिस ग्रुप’ने व्यक्त केला आहे.