सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याची केंद्रीय कृषिमंत्र्यांना दखल घ्यावी लागली. व्हायरल झालेला एक व्हिडीओ, जो बघून प्रत्येकजण हळहळला. शेतातून बाजारात विक्रीसाठी आणलेला भुईमूग अवकाळी पावसाने वाहून जाऊ लागला. भर पावसात शेतकरी ते अडवण्याचे प्रयत्न करत होता. महाराष्ट्रातील या शेतकऱ्याला केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कॉल करून धीर दिला आणि मदतीची ग्वाही दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह यांनी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी गौरव पनवार यांना कॉल केला आणि धीर दिला.
केंद्रीय कृषिमंत्री शेतकरी गौरव यांना काय बोलले?
शिवराज सिंह चौहान यांचा शेतकऱ्याशी संवाद करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
"मी तुमचा तो भुईमूग पाऊस पडल्यामुळे खराब झाल्याचा व्हिडीओ बघितला. मला वेदना झाल्या, पण तुम्ही काळजी करू नका. महाराष्ट्रातील सरकार संवेदनशील आहे. माझे आता आताच बोलणं झालं आहे. देवेंद्रजी असो किंवा महाराष्ट्राचे कृषिमंत्री दोघेही संवेदनशील आहेत", शिवराज सिंह चौहान गौरव पनवार यांना म्हणाले.
"माझे जिल्हाधिकाऱ्यांशीही बोलणे झाले आहे. जे नुकसान बाजारात झाले आहे, त्याची भरपाई तुम्हाला दिली जाईल, जेणेकरून भुईमुगाचे नुकसान झाल्यामुळे तुम्हाला अडचणी येऊ नयेत. कुटुंबाला विवंचनेचा सामना करायला लागू नये. सोमवारपर्यंत पाहणी करतील आणि जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई केली जाईल", असे सांगत शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्याला धीर दिला.
"मी कृषिमंत्री आहे. मला शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. मी तुमचा व्हिडीओ बघितला आणि बोलण्यासाठी कॉल केला. काळजी करू नका. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार तुमच्यासोबत आहे, तुम्ही काळजी करू नका", असेही शिवराज सिंह चौहान गौरव पनवार यांना म्हणाले.
महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस होत आहे. काही दिवसांपूर्वी गौरव पनवार यांनी शेतात निघालेला भुईमूग विक्रीसाठी बाजारात आणला होता. पण, अचानक अवकाळी पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसामुळे काही वेळातच पाणी वाहू लागले आणि त्यात भुईमुगही वाहून जाऊ लागला. वाहून जाणारा भुईमूग थांबवतानाचा पनवार यांचा भर पावसातील व्हिडीओ व्हायरल झाला होता.