माळीण गावावर दु:खाचा डोंगर
By Admin | Updated: July 31, 2014 11:06 IST2014-07-31T04:43:05+5:302014-07-31T11:06:25+5:30
आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये वसलेल्या माळीण गावावर बुधवारी सकाळी अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला.
माळीण गावावर दु:खाचा डोंगर
घोडेगाव (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये वसलेल्या माळीण गावावर बुधवारी सकाळी अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेत माळीण गाव नकाशावरून नष्ट झाले आहे. सुमारे ७०४ लोकवस्तीच्या या गावातील सुमारे २०० जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. सायंकाळपर्यंत
२० मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे ३०० जवान बचावकार्यात गुंतले आहेत.
आजची सकाळ माळीण गावावर अस्मानी संकट घेऊनच उगवली. आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांची रोजची कामे सुरू असताना अचानक बाजूच्या डोंगराचा संपूर्ण कडाच खाली कोसळला. प्रचंड आवाज आणि चिखलाचा प्रचंड मोठा लोंढा गावाच्या दिशेने वेगाने आला. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीच मिळाली नाही. संपूर्ण गावच चिखलाखाली गाडले गेले. या गावातील सुमारे २५ ते ३० फूट उंचीच्या मारुती मंदिराचा केवळ कळसच दिसत होता. चिखलाच्या लोंढ्याबरोबर काही जण वाहत गेले. त्यापैकी चार महिला ओढ्यापर्यंत वाहत गेल्या. त्या सुदैवाने बचावल्या. एका घराच्या भिंतीला अडकून दोन महिला वाचल्या. या सहाही जखमी महिलांना अडिवरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
ही दुर्घटना कळल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र संपूर्ण गावच चिखलाखाली गाडले गेलेले असल्याने मदतकार्य कसे सुरू करायचे, हा प्रश्न होता. त्यामुळे तातडीने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. घोडेगाव येथून दोन जेसीबी आणि पोकलेन मागविण्यात आले. आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्याच्या सर्व भागातून स्वयंस्फूर्तीने रुग्णवाहिका आणि जेसीबीही रवाना झाले. मात्र रस्ता अरुंद असल्याने वाहतूककोंडी झाली होती.