वधूने रुखवतात मिळविले तयार शौचालय
By Admin | Updated: May 16, 2015 00:12 IST2015-05-16T00:12:34+5:302015-05-16T00:12:34+5:30
स्वच्छतेचा ध्यासापोटी ग्रामीण भागातील मुलीची प्रेरणादायी वाटचाल.

वधूने रुखवतात मिळविले तयार शौचालय
राजेश्वर वैराळे/ बोरगाव वैराळे : घरात शौचालय नसल्याने ग्रामीण भागातील स्त्रियांचे होणारे हाल ध्यानी घेऊन केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यासंदर्भात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. हीच जागरुकता दाखवत अकोला जिल्ह्यात एका नववधुने रुखवतात तयार शौचालय मिळविले. तिच्या या आग्रही भूमिकेमुळेच विवाहसोहळ्य़ातच तिचा सत्कार करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्याच्या मोझर येथील कृष्णकुमार माकोडे याच्याशी चंदा ऊर्फ चैताली दिलीप गाळखे (राठोड) हिचा विवाह ठरला; मात्र सासरी शौचालय नसल्याचे तिला समजले. माहेरी शौचालय असल्याने तिने सासरीही शौचालय असावे, असा निर्धारच केला. तिने कुटुंबीय आणि नातेवाइकांकडे रुखवतात तयार शौचालय (रेडिमेड) मिळावे, यासाठी आग्रह धरला. तिच्या या आग्रहाचे कुटुंबीय आणि इतर नातेवाइकांनी कौतुक करीत तिला तयार शौचालय देण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी बाळापूूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) येथे पार पडलेल्या तिच्या विवाह सोहळ्यात तिचे मामा गजानन नाडे यांनी तिला रेडिमेड शौचालय रुखवतात दिले.
*कौतुकाचा वर्षाव..
रुखवतात रेडिमेड शौचालय मिळवून स्वच्छतेचा ह्यआयकॉनह्ण ठरलेल्या चंदाचा शुक्रवारी लग्नात गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.