महापुरुषांना जिल्ह्यात सर्वत्र अभिवादन
By Admin | Updated: August 3, 2016 01:15 IST2016-08-03T01:15:53+5:302016-08-03T01:15:53+5:30
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले

महापुरुषांना जिल्ह्यात सर्वत्र अभिवादन
पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी करण्यात आली व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर उपप्राचार्य लक्ष्मणराव घोलप,
प्राचार्य संतोष पवार, प्राध्यापक भाऊसाहेब सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी विभागाचे संतोष पवार म्हणाले, की लोकमान्य टिळक स्वराज्याचा मंत्र देणार लढाऊ व्यक्तिमत्त्व होते. कारण त्यांनी विचार आणि कृती या दोन्ही क्षेत्रांत सारखेच कर्तृत्व गाजवले व आधुनिक भारताचे शिल्पकार ठरले. साठे यांनी वैयक्तिक दु:खाचा विचार न करता आपले विचार कार्य प्रतिभा यांच्या साह्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. वंचिताच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे ते लोकशाहीर होते.
गायकवाड आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाले, की टिळकांनी एकदा ध्येय निश्चित केले, की कठीण परिस्थितीला तोंड देत ध्येयप्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करून ते ध्येय गाठायचे त्यांची इच्छाशक्ती पोलादासारखी होती. त्यांनी आपल्या लेखनातून मानवजातीच्या हिताचा प्रश्न मांडला आणि तो समाजमनावर ठसवला; म्हणून ते कर्मयोगी व्यक्तिमत्त्व आहे. तर, साठे एक शाहीर म्हणून परिचित असले, तरी कथा आणि कांदबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवामुक्ती संग्राम या चळवळीमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान मोलाचे आहे.
उपप्राचार्य लक्ष्मणराव घोलप यांनी प्रास्ताविक केले. वैशाली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब सांगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.