विशेष परीक्षेला ग्रीन निकालाला रेड सिग्नल

By Admin | Updated: August 27, 2014 00:55 IST2014-08-27T00:55:26+5:302014-08-27T00:55:26+5:30

रवेशबंदीच्या यादीमधल्या ६३ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, मंगळवारी विशिष्ट अटींसह हिरवी झेंडी दाखविली.

Green Tested Red Signal for Special Examination | विशेष परीक्षेला ग्रीन निकालाला रेड सिग्नल

विशेष परीक्षेला ग्रीन निकालाला रेड सिग्नल

हायकोर्ट : प्रवेशबंदी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे प्रकरण
नागपूर : प्रवेशबंदीच्या यादीमधल्या ६३ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, मंगळवारी विशिष्ट अटींसह हिरवी झेंडी दाखविली.
न्यायालयाच्या निर्णयानुसार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेता येईल, पण न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय परीक्षेचा निकाल जाहीर करता येणार नाही. याशिवाय ही विशेष परीक्षा प्रा. सुनील मिश्रा यांच्या रिट याचिकेवरील (२४४८/२०१३)अंतिम निर्णयाच्या आधीन राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्तीद्वय अशोक भंगाळे व चंद्रकांत भडंग यांनी हा निर्णय देऊन याचिकेवरील पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर निश्तिच केली.
विशेष परीक्षेला बसणारे सर्व विद्यार्थी गेल्या शैक्षणिक सत्रातील आहेत. विद्यापीठाने ९ एप्रिल २०१३ रोजी एकही मान्यताप्राप्त पूर्णवेळ प्राध्यापक नसलेल्या महाविद्यालयांची यादी न्यायालयासमक्ष सादर केली होती. या महाविद्यालयांमध्ये दिलेले प्रवेश पुढील आदेशाधीन राहतील व त्यासाठी प्रतिवादी जबाबदार राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. यानंतर विद्यापीठाने ३३८ महाविद्यालयांवर प्रवेश बंदी लादली होती. काही दिवसांनी अनेक नावे वगळून २५० महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी कायम ठेवण्यात आली. यातील ६३ महाविद्यालयांतील ६६१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश वैध असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. न्यायालयाने विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास कधीच मनाई केली नसल्याने व राज्य शासनाने विशेष परीक्षा घेण्याचे आदेश दिल्याने काही दिवसांपूर्वी विद्यापीठ सक्रिय झाले. विद्यापीठाने विशेष परीक्षेचा अध्यादेश पारित करून कुलपतींकडे पाठविला. कुलपतींनी अध्यादेशाला मान्यता दिली. परिणामी विशेष परीक्षेसाठी येत्या २८ आॅगस्टपासून तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. विशेष परीक्षेसाठी ६६१६ मधून फार कमी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विशेष परीक्षेला न्यायालयाने अद्याप परवानगी दिली नव्हती. हा मुद्दा आता तात्पुरता निकाली निघाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Green Tested Red Signal for Special Examination