जव्हारला होणार ग्रीन हिल सिटी!
By Admin | Updated: November 27, 2014 22:38 IST2014-11-27T22:38:45+5:302014-11-27T22:38:45+5:30
पूर्वी जव्हार तालुका घनदाट जंगलातील प्रसिद्ध होता. वाघ, हरीण, कोल्हा, रानडुक्करे, ससे यासारख्या वन्यप्राण्यांचा स्वच्छंद वावर या भागात आढळायचा.

जव्हारला होणार ग्रीन हिल सिटी!
हुसेन मेमन ल्ल जव्हार
पूर्वी जव्हार तालुका घनदाट जंगलातील प्रसिद्ध होता. वाघ, हरीण, कोल्हा, रानडुक्करे, ससे यासारख्या वन्यप्राण्यांचा स्वच्छंद वावर या भागात आढळायचा. त्यामुळे पर्यावरणाबरोबरच निसर्गाचा समतोल देखील राखला जाई व पर्यटकांमध्ये सुद्धा जव्हार हे मिनी महाबळेश्वर शहर अशी ख्याती होती. परंतु साग, शिसव यासारख्या दुर्मीळ व मौल्यवान झाडांची तस्करी व अवैध वृक्षतोडीमुळे जव्हार तालुक्याला ओसाड रूप प्राप्त व्हायला लागले. जव्हार तालुक्याला पूर्वीचेच वैभव प्राप्त करून देण्यासाठी आता वनविभागानेच पुढाकार घेऊन वृक्षलागवड व संवर्धनासाठी मोठय़ा प्रमाणात कामे हाती घेतली असून अनेक ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आता जव्हार शहर हे ग्रीनहिल सिटी म्हणून प्रसिद्ध पर्यटनस्थळ विकसीत होणार असल्याने पर्यटकांमध्ये व जव्हारकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वृक्षलागवड करण्यापूर्वी जव्हार वनक्षेत्रपाल सिंग यांनी संपूर्ण तालुक्याचा एक विकास आराखडा तयार केला. त्यात वनविभागाच्या ज्या जमिनी आहेत त्या सर्व सुरक्षीत राहाव्यात, त्यावर अतिक्रमणो होऊ नयेत म्हणून प्रथम त्या जमिनींना भक्कम तारेचे कुंपण घातले. काही वनजमीनींवरील अतिक्रमणो करताना स्थानिकांशी संघर्ष देखील झाला. परंतु त्यांच्याशी सुसंवाद साधल्यानंतर अनेकांनी स्वत:हून त्या जागांवरील अतिक्रमणो हटवली.
लागवडीसाठी आम्ही लहान रोपांऐवजी 1क् ते 15 फुट उंचीची तयार झाडांची लागवड केली जाईल. त्यांना पाण्यासाठी जागोजागी छोटे छोटे बांध, बंधारे बांधले जातील, साधारण 2 वर्षात त्या वृक्षांची पूर्ण वाढ होऊन घनदाट जंगल तयार झाल्यानंतर इतर भागातील वन्यप्राणी त्या जंगलात सोडून देण्यात येतील. त्यामुळे पर्यावरणाबरोबरच निसर्गाचा देखील समतोल राखला जाईल, असे स्थळाला प्रत्यक्ष भेट देताना सिंग यांनी सांगितले.
तालुक्यातील प्रसिद्ध असलेले दाभोसा, हिरडपाडा हे अतिप्राचीन धबधबे, भूपतगड किल्ला, काळमांडवी धबधबा, शिरपामाळ यासह हनुमान पॉईंट, सनसेट पॉईंट, जयसागर धरण या ठिकाणांबरोबरच तालुक्यात अशी अनेक ठिकाणो आहेत ज्या ठिकाणांचा अद्याप विकासच झाला नसल्याने ते दुर्लक्षीत आहेत. ती ठिकाणो देखील विकसीत केली जाणार आहेत.