महायुती तुटली, देव उठले...

By Admin | Updated: September 25, 2014 23:25 IST2014-09-25T21:54:46+5:302014-09-25T23:25:51+5:30

सरकारनामा

The greatness is broken, God got up ... | महायुती तुटली, देव उठले...

महायुती तुटली, देव उठले...

घट बसले आणि विचारात गढून गेलेल्या भाऊंनी डोळे किलकिले केले. ‘मागच्या वेळेला नेमकं काय चुकलं? आपली ‘गेम’ झालीच कशी?’ याच विचारात गेली साडेचार वर्षं ते मग्न होते म्हणे! उत्तर सापडेना म्हणून आता ‘माझं काय चुकलं’, असं लोकांनाच विचारायची वेळ आली... ‘जाऊदे. संपला एकदाचा पितृ पंधरवडा. सर्वपित्री अमावास्येनंतर ‘पितरांचा’ त्रास संपला, पण या ‘पितरांचं’ काय? ’ अशा नव्या सवालांची जंत्री डोक्यात फिरू लागली. (या जंत्रीसोबत जयंतराव, दिनकरतात्या, संभाजीआप्पा अशा राहू-केतू-शनीसह सुरेशअण्णा, श्रीनिवासराव, , धनपालतात्या, दिगंबर आणि मुन्नाभाई असं समस्त ग्रहमंडल डोळ्यासमोर चमकू लागलं.) ‘त्यातच कदमसाहेबांनी मिरजेचा नवा घोळ करून ठेवलाय. मागच्या वेळी प्रतीकनं हट्टानं जागा घेतली, आता कदमसाहेब इरेला पेटलेत. या दोघांना मिरजेचा इंगा काय माहीत...? मिरजेत इद्रिसची मानगूट पकडावी, तर सटकन् निसटून जातोय आणि सुरेश आवटी तर दोन्ही हाताच्या पकडीत घावत नाही. किशोरची तर इकडं-तिकडं करायची सवय अजून गेलेली नाही. आपलीच जागा काढायची मारामार, तिथं मिरजेचं कसं करायचं?’... प्रश्न सतावू लागले... म्हणून भाऊंनी परत डोळे मिटले. तिकडं कदमसाहेब सकाळीच कामाला लागलेले. ‘पृथ्वीराजबाबाला (कराडच्या नव्हे कडेगावच्या!) थांबवायचं कसं? एवढी कामं करूनही मागच्यावेळी लीड पस्तीस हजारावर कसं आलं? विश्वजितचं बस्तान कसं बसवायचं?’ अशा प्रश्नांचं काहूर डोक्यात उठलेलं. ‘यंदा मदन आणि प्रतीक यांच्यावर ‘गेम’ करून मिरजेचं तिकीट आणलंय, आता जतचं तेवढं बघायला पाह्यजे’.. अशा विचारात असतानाच देव बसवण्यासाठी आत येण्याचा निरोप आला. (इथं आमचं देव उठायची वेळ आलीय आणि देव बसवा म्हणे!... साहेबांनी नेहमीच्या ‘स्टाईल’नं सुनावलं. पण मनातल्या मनात!) ते उठले. त्यांनी शिबड्यात वावरी टाकून पाणी शिंपडलं. धान्य टोकलं. (त्यांच्या मनात आलं, घरटी एकाला नोकरीला लावलंय, पाणी आणून मतदारसंघ हिरवागार केलाय; मग आणखी किती पेरणी करायची? किती पाणी द्यायचं?) घट बसवला. देव बसले (आमचे देव उठवू नको रे, म्हणजे झालं... असं साकडं घातलं.) आणि साहेब बाहेर पडले... बाबांचे देव उठवायला! तेवढ्यात मोहनशेठ धोतराचा सोगा धरून घाईघाईनं आले. कानात काहीतरी बोलले. साहेबांची कळी खुलली. त्यांनी हसून मान हलवली. ‘बरं झालं, महायुतीचा पोपट मेला. आता आघाडीचीही बिघाडी होणार. मग आपण ‘सेफ’. आता त्यांचंच देव उठतील,’ या विचारातच त्यांनी ड्रायव्हरला गाडी पुढं घेण्याची खूण केली...
- श्रीनिवास नागे

Web Title: The greatness is broken, God got up ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.