औरंगाबाद : चेहरे, जातपात आणि धर्मापल्याड विचार करून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या हाती लेखणी सोपवित त्यांना लिहितं करणा-या ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासोबतच्या पत्रकारितेतील अनुभवाची सुंदर गुंफण असलेल्या ‘आमचं विद्यापीठ’ या पुस्तकाचे रविवारी एका हृदयस्पर्शी सोहळ्यात शानदार प्रकाशन झाले. या पुस्तकाचे नायक राजेंद्र दर्डा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू यानिमित्ताने त्यांचे मित्र, चाहते, वाचक व परिजनांच्या समोर आले.या चालत्या-बोलत्या विद्यापीठातून बाहेर पडून महाराष्ट्रासह देशभरात पसरलेले शेकडो उच्चपदस्थ, मानाच्या जागा पटकावणारे विद्यार्थी रविवारी खास करून औरंगाबादला आले होते. त्यांच्यासह शहरवासीयांच्या उपस्थितीने ‘एमजीएम’चे रुख्मिणी सभागृह ओसंडून वाहत होते. ‘मी मराठी’चे संपादकीय सल्लागार कुमार केतकर, ‘प्रहार’चे संपादक मधुकर भावे व ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते ‘आमचं विद्यापीठ’चे प्रकाशन झाले. बाबूजींच्या (जवाहरलाल दर्डा) संस्कारातून हे चालते-बोलते विद्यापीठ घडले आहे, असे सांगत मधुकर भावे यांनी राजेंद्र दर्डा यांचा नागपूर ते मराठवाडा प्रवास आणि मराठवाड्यात ‘लोकमत’च्या उभारणीच्या खडतर तपश्चर्येतील अनेक भावोत्कट प्रसंग बोलके केले. या विद्यापीठाचे तीन कुलगुरू आहेत. हे तिघे एकत्र येतात, तेव्हा एक दत्तात्रय होतो. त्यांनी मिळून राज्यात ११ विद्यापीठे उभी केली, असेही ते म्हणाले. सुलभ भाषा व आकर्षक मांडणीने अगदी विद्यार्थीदशेतच मला ‘लोकमत’ची सवय जडली. राजेंद्र दर्डा यांनी ज्या पद्धतीने माणसं हेरली, त्यांची क्रिएटिव्हिटी, आत्मविश्वास जागा केला, त्यांच्या परीसस्पर्शाने अनेकांना मोठेपण आले, असे उद्गार राजीव खांडेकर यांनी काढले.‘माझं विद्यापीठ’ हा स्मृतींचा सुंदर कोलाज आहे, असे मत प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’च्या वितरण विभागात वर्षभर कार्यरत असताना राजेंद्र दर्डा यांनी दिलेल्या संधीमुळे मी विद्यापीठात अभिनयाचे धडे गिरवू शकलो, असे ते म्हणाले. ज्योती अंबेकर यांनी प्रकाशन सोहळ््याचे सूत्रसंचालन केले. ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर, रेखा प्रकाशनचे हेमराज शहा, पुस्तकाचे संपादक-लेखक, मुंबई ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. संपादक चक्रधर दळवी यांनी आभार मानले. ‘आमचं विद्यापीठ’ या पुस्तकात दिनकर रायकर, कुमार केतकर, मधुकर भावे, व्यंकटेश केसरी, प्रशांत दळवी, अजय अंबेकर, चक्रधर दळवी, नंदकिशोर पाटील, श्रद्धा बेलसरे, राजा माने, विजय बाविस्कर, सुधीर महाजन, इम्तियाज जलील, सुजाता आनंदन्, विलास तोकले, विवेक रानडे, लखीचंद जैन, मोहन राठोड यांनी आपले अनुभव सांगितले आहेत. (प्रतिनिधी)> ...पण पुढे तसा प्रयत्न करतो -राजेंद्र दर्डा ४३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात आपण मला सांभाळले. मी विद्यापीठ आहे की नाही हे मला माहीत नाही; पण पुढे तसा होण्याचा प्रयत्न करेन, असे भावपूर्ण उद्गार राजेंद्र दर्डा यांनी काढले. ते म्हणाले, की १९७४ ला शिक्षण संपवून मी लंडनहून परतलो आणि नागपुरात कामावर रुजू झालो. मोठा काळ लोटला; पण तेव्हापासूनचा सर्व प्रवास, सारी दृश्यं माझ्या नजरेसमोरून चित्रपटासारखी पुढे सरकत आहेत. यश, दु:ख, संघर्ष, सर्व मनाभोवती रुंजी घालत आहेत. अवतीभोवती सर्वच माझ्यावर प्रेम करणारे आहेत. याप्रसंगी बाबूजींची मला खूप आठवण येते. विदर्भातून येथे आलो, तेव्हा काय होते माझ्याकडे. बाबा दळवींचे बोट धरून येथे आलो. पा. वा. गाडगीळ,बाबा दळवी आदींसारखे संपादक हे आमचे वैचारिक धन होते. तोच वैचारिक वारसा आम्ही पुढे चालवीत आहोत. समाजामध्ये सर्वच अमंगल, भ्रष्ट नाही. मात्र अशाच बातम्या पुढे आणल्या तर समाजातील पुरुषार्थ संपून जाईल. समाजातील चांगली बाजू पुढे आणली पाहिजे. जिद्द, मेहनत आणि सतत प्रयत्नशील राहा, असा हितोपदेश त्यांनी केला.> ‘लोकमत’ची अधिक गरजलोकमत’ स्थापन झाले तेव्हासारखीच परिस्थिती आजही असल्याचे सांगून कुमार केतकर म्हणाले, की सर्वांनाच पुढच्या चार वर्षांत मोठ्या कसोट्या व आव्हानांना सामोरे जायचे आहे. ही आव्हाने कोणती असतील, हे आताच सांगता येणार नाही. परंतु सर्वधर्मसमभाव, समाजवाद व संस्कृतीला मोठा धोका निर्माण झालेला असताना अबोल जनतेला पुन्हा वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत’ची गरज आहे.
‘आमचं विद्यापीठ’चे शानदार प्रकाशन
By admin | Updated: February 16, 2015 03:44 IST