सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना फटका
By Admin | Updated: November 16, 2014 23:52 IST2014-11-16T23:25:43+5:302014-11-16T23:52:30+5:30
चिंतेचे वातावरण : पाऊस थांबला तरी बागांमध्ये पाणी साचून; संकटांची मालिका कायम

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना फटका
सांगली : अवकाळी पावसाच्या सातत्यामुळे गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात द्राक्ष बागायतदारांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. होणारे अतोनात नुकसान बागायतदाराला मात्र न परवडणारे आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळीच्या नुकसानीबाबत प्रशासकीय पातळीवर पंचनामे करावेत, अशी मागणी आता केली जात आहे.
तासगाव : यंदा बागायतदारांनी उशिरा छाटण्या घेतल्या. मागील वर्षी दावण्याचाच जबरदस्त फटका बसल्याने बागा सोडाव्या लागल्या होत्या. त्यामुळे यंदा छाटण्या उशिरा झाल्या. उशिरा छाटण्या झालेल्या बागांमध्ये सध्या फुलोऱ्याची स्थिती आहे. अत्यंत नाजूक अवस्थेत हे घड तयार होत असताना पाऊस पडल्यावर घड कुजीचे व गळीचे प्रमाण वाढल्याने झाडावरचे चांगले घड गायब होऊ लागले आहेत.
तासगाव तालुक्यात जवळजवळ ४0 टक्क्यापेक्षा जास्त बागा फुलोऱ्याच्या स्थितीत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या प्रमाणात असलेल्या बागांना झटका बसल्यावर उत्पादनाचे प्रमाण कमी होणार आहे. औषधांची फवारणी न थांबता सुरूच असल्याने हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्चाचा बोजा बागायतदारांवर बसला आहे. हा खर्च खूप असल्याने कमी भांडवलात असणाऱ्या बागायतदाराला पैशाची व्यवस्था करावी लागत आहे. प्रसंगी हातउसने पैसे घेऊन मजुरांचे पगार, औषध फवारणीचे काम सुरू आहे.
सावळज : तासगाव तालुक्याबरोबरच मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, पलूस व खानापूरच्याही काही भागामध्ये द्राक्षशेतीची वेगााने वाढ झालेली आहे. वाढत असणाऱ्या द्राक्षशेतीला पहिला ब्रेक लागला तो २००३-०४ च्या पडलेल्या दुष्काळामध्ये. सलग दोन वर्षे पाऊस न पडल्यामुळे हजारो एकर बागांवर संकट आले होते. त्यातही बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले. २००४ ला चांगला पाऊस झाल्यानंतर खचून न जाता नव्याने द्राक्षबागांची लागवड केली. कायमस्वरूपी पाण्यासाठी शेततळी बांधली. एक किलोमीटरपासून ते २० कि. मी.पर्यंत पाईपलाईनने पाणी आणले व टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला.
यावर्षी फेब्रुवारी व मार्च २०१४ मध्ये द्राक्षबागा ऐन भरात असताना हजारो एकर द्राक्षबागांचे नुकसान झाले. सप्टेंबर व आॅक्टोबर २०१४ मध्ये शेतकऱ्यांनी पीकछाटण्या घेतल्या. मात्र २५ आॅक्टोबरपासूनच परत एकदा अवकाळी पावसाने दणका दिला.
औषध फवारणीची धडपड सुरूच
जिल्ह्यात आज (रविवार) पावसाने उसंत घेतली. यामुळे काही प्रमाणात द्राक्ष बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. परंतु पाच-सहा दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज पाहणीनंतरच आणि बागांमधील पाणी मुरल्यानंतरच करता येणार आहे. लहरी निर्सगापुढे बागायतदार अक्षरश: हतबल झाले आहेत. बागा जगविण्यासाठी औषध फवारणी तसेच विविध उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही द्राक्ष बागायतदारांना कितपत फायदा होईल, याची कल्पना करता येत नाही.
येळावी परिसराला अवकाळीचा तडाखा
येळावी : येळावी (ता. तासगाव) व परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने चालू वर्षी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, आता शेतकरी शासनदरबारी आपल्या नुकसानीची दखल घेऊन मदतीची अपेक्षा करीत आहेत. अन्यथा शेतकऱ्यांचे जगणेच मुश्कील झाले आहे. परिसरातील गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अगोदरच हवालदिल असलेल्या बळिराजाला शनिवारी जोरदार पावसाने पूर्णत: उद्ध्वस्त करून टाकले. त्यामुळे बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.
मिरज पूर्वमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लिंगनूर : मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने व संततधार पावसाने द्राक्षबागांची दैना उडाली आहे. अद्याप या झटक्यातून अनेक द्राक्ष बागायतदार सावरले नाहीत. मात्र आज सकाळी सहापासूनच स्वच्छ सूर्यप्रकाश पडला असून वातावरण निवळले आहे. आजही अंशत: ढगाळ वातावरणाची नोंद असली तरी, मिरज पूर्व भागात तरी काही दिवस वातावरण अंशत: सूर्यप्रकाशित व अंशत: ढगाळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना धीर आला आहे. पण या आठवड्यात रोगांनी केलेले आक्रमण थोपवण्यासाठी व बागा वाचविण्यासाठी द्राक्ष बागायतदारांचा आटापिटा सुरू आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर द्राक्षघडांतील गळ झालेल्या उत्पादकांना हताश होण्याची वेळ आली आहे.
मागील चार-पाच दिवसांपासून मिरज पूर्व भागातील आरग, बेडग, मालगाव, सुभाषनगर, लिंगनूर, बेळंकी, कदमवाडी, सलगरे, संतोषवाडी, एरंडोलीसह परिसरात अवकाळी व संततधार पावसाने दैना उडविली आहे. विशेष करून द्राक्ष उत्पादकांना आपल्या बागांची व बागेतील प्रत्येक झाडाची रोजच्या रोज पाहणी करावी लागत आहे. या परिसरात आॅगस्ट ते आॅक्टोबर अशा विविध महिन्यांच्या तारखांना फळछाटण्या घेतल्या जातात. ज्या बागा फ्लॉवरिंग स्टेजमधील आहेत, त्या बागांना मात्र या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. २० ते ६० टक्के द्राक्षघडांची गळ झाली आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. त्याचा प्रत्येक शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
अशा बागांचे पंचनामे करून अशा द्राक्षोत्पादकांना अवकाळी संकटातून वाचविण्यासाठी नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. अन्यथा यंदाच्या लाखो रुपयांच्या नुकसानीमुळे उत्पादक देशोधडीला लागणार आहेत. तसेच ज्या द्राक्षबागांचे मणी सेट झाले आहेत, त्या बागांना मणी गळ होण्याचा धोका नाही. पण त्यांना रोगांचा धोका कायम आहे. त्यामुळे या द्राक्षबागांचीही काळजी उत्पादक घेत आहेत.
या आठवड्यात जिल्ह्यात अंशत: ढगाळ व काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता निर्माण झाली आहे, तर १० डिसेंबरदरम्यान पुन्हा पावसाची शक्यता काही हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संकेतस्थळांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हंगामपूर्व द्राक्षांना या हवामानाची चिंता लागली आहे. बागांसमोरील संकटमालिका अजूनही कायम आहे. (वार्ताहर)
संतोषवाडी, लिंगनूर, कदमवाडी, खटाव व सलगरे या भागात काही मार्केटिंगसाठी द्राक्षशेती करणारे अत्यंत धाडशी शेतकरी आहेत. त्यांनी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातील मुहूर्तावर द्राक्षबागांची छाटणी घेतली आहे. या द्राक्षांना आता तीन महिने पूर्ण झाली आहेत. येत्या २० ते ३० दिवसात ही हंगामपूर्व द्राक्षे काढणीसाठी तयार होणार आहेत. या बागांतील द्राक्षमण्यांत आता पाणी भरले असून येत्या आठवड्यात त्यामध्ये अंशत: साखर उतरण्यास प्रारंभ होणार आहे. पण या मण्यांत पाणी भरले असल्याने त्यामध्ये दावण्या, भुरी, फळकूज अशा रोगांची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहे. त्यामुळे एकंदर सर्वच टप्प्यांतील बागांना रोग, कूज आणि मण्यांची गळ अशा विविध प्रकारांनी धोका सतावत आहे. त्याचा कमी-अधिक प्रमाणात भागातील सर्वच द्राक्षबागांना फटका बसला आहे.
पीक नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी
नरवाड : नरवाड (ता. मिरज) येथे झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. गावाच्या एकंदरीत दोनशे हेक्टर क्षेत्रात द्राक्षबागा आहे. तीन दिवसांपासून खराब हवामान अन् दमदार पावसाने विशेषत: फुलोऱ्यातील द्राक्षबागांचे घड पूर्णपणे गळून गेले आहेत. महसूल आणि कृषी खात्याने नुकसानीचे पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याची मागणी होत आहे.