सभापतींवरील अविश्वास मंजूर
By Admin | Updated: March 17, 2015 01:49 IST2015-03-17T01:49:04+5:302015-03-17T01:49:04+5:30
विधान परिषदेच्या इतिहासात आज सोमवारी एक अभूतपूर्व अशी घटना घडली. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव भाजपाच्या पाठिंब्यामुळे मंजूर झाला.
सभापतींवरील अविश्वास मंजूर
विधान परिषदेत अभूतपूर्व घटना : राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपाची अभद्र युती, शिवसेना तटस्थ
मुंबई : विधान परिषदेच्या इतिहासात आज सोमवारी एक अभूतपूर्व अशी घटना घडली. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव भाजपाच्या पाठिंब्यामुळे मंजूर झाला. अविश्वास ठरावाच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शेकाप व अन्य ४ अशा ४५ सदस्यांनी मते टाकली; तर ठरावाच्या विरोधात काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी व लोकभारती अशा २२ सदस्यांनी मतदान केले. शिवसेनेने अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात भूमिका मांडली खरी, परंतु प्रत्यक्ष मतदानावेळी ते तटस्थ राहिले.
सभापती देशमुख यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांची निवड घोषित न करून पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित व अन्य २४ सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर तब्बल चार तास चर्चा झाली. चर्चेअंती जेव्हा ठराव मताला टाकला तेव्हा त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या २८, भाजपाच्या १२, शेकापचे १ तसेच नागो गाणार, रामनाथ मोते, दत्तात्रय सावंत, अपूर्व हिरे या शिक्षक आमदारांनी पाठिंबा दिला. ठरावाच्या विरोधात काँग्रेसचे २०, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे व लोकभारतीचे कपिल पाटील अशा २२ सदस्यांनी मतदान केले. विजय सावंत हे सदस्य अनुपस्थित होते, तर शिवसेनेच्या ७ सदस्यांसह अपक्ष सदस्य श्रीकांत देशपांडे हे तटस्थ राहिले. उपसभापती वसंत डावखरे हे पीठासीन असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता.
अविश्वास ठरावावरील चर्चेच्या निमित्ताने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या नेत्यांनी परस्परांवर टीकास्त्र सोडले, एकमेकांना चिमटे घेतले, वेळप्रसंगी एकमेकांचे वाभाडे काढले. यामुळे काहीवेळा सभागृहात हास्याची लकेर उठली, तर काही क्षण तणाव निर्माण झाला. (विशेष प्रतिनिधी)
रामाने बाण मारण्याची गरज नव्हती!
आपल्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर काही बोलायचे नाही. आकड्यांची सोंगटी फेकून सारीपटावर अप्रतिष्ठेचे गणित जुळवण्याच्या या प्रकाराचा आपल्याला खेद वाटतो. खरेतर, वाली व सुग्रीव यांच्या भांडणात रामाने बाण मारण्याची गरज नव्हती!
- शिवाजीराव देशमुख
भाजपाचे ‘मूंह में राम, बगल में छुरी’
च्भविष्यात भाजपा व राष्ट्रवादीची आघाडी होण्याचे स्पष्ट संकेत या ठरावावरील उभय पक्षांच्या भूमिकेवरून मिळाले आहेत, असा आरोप माणिकराव ठाकरे यांनी केला.
च्‘मूंह मे राम, बगल में छुरी’ असे भाजपाचे धोरण असून त्यांचे राष्ट्रवादीबरोबर साटेलोटे सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या सर्व वादग्रस्त नेत्यांची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली.
च्आज आम्ही जात्यात आहोत, पण उद्या काँग्रेसच्या सुपातील व टोपलीतील नेत्यांची चौकशी होणार आहे, असा इशारा सुनील तटकरे यांनी दिला. भाजपासोबत जायचे असते तर १९९९ सालीच सरकारमध्ये गेलो असतो, असेही ते म्हणाले.
१९७९ची आठवण
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार असताना ५ एप्रिल १९७९ रोजी विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष गजाननराव गरुड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला होता. काँग्रेसने बहिष्कार टाकल्याने तो बहुमताने मंजूर झाला होता.
उपसभापतीपद भाजपाला
विधान परिषद सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर यांची निवड होण्याची शक्यता आहे. शिवाजीराव देशमुख यांच्यावरील अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याच्या मोबदल्यात भाजपाला उपसभापतीपद दिले जाऊ शकते. या पदासाठी भाजपाकडून ज्येष्ठ सदस्य पांडुरंग फुंडकर यांचे नाव चर्चेत आहे.