विद्यापीठाचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
By Admin | Updated: March 29, 2016 01:52 IST2016-03-29T01:52:48+5:302016-03-29T01:52:48+5:30
मुंबई विद्यापीठाचा २०१६-१७ आर्थिक वर्षाचा शिलकीचा अर्थसंकल्प सोमवारी पार पडलेल्या अधिसभेत मंजूर करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी ६ कोटी

विद्यापीठाचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
मुंबई : मुंबई विद्यापीठाचा २०१६-१७ आर्थिक वर्षाचा शिलकीचा अर्थसंकल्प सोमवारी पार पडलेल्या अधिसभेत मंजूर करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी ६ कोटी ३९ लाख ५४ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.
यंदाच्या अर्थसंकल्पात विविध नावीन्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये कौशल्य विकास केंद्र, मेक इन इंडिया केंद्र, डिजिटल विद्यापीठ, संरक्षित जागेचा विकास, स्मार्ट गाव योजना, शैक्षणिक विद्वत्तेची जोपासना, विद्यार्थी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, रेल्वे संशोधन केंद्र, विद्यापीठाची सामाजिक जबाबदारी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या १६० व्या वर्धापन दिनासाठी अर्थ संकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी नियोजित बांधकामांमध्ये विद्यानगरीमध्ये विविध बांधकामे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात येथील अॅकॅडमिक स्टाफ कॉलेजच्या वसतिगृहाचे बांधकाम, बाबु जगजीवनराम छात्रावास योजनेअंतर्गत मुला-मुलींच्या वसतिगृहांचे बांधकाम, हिंदी भाषा भवनचे बांधकाम, मल्टीपर्पज हॉलचे बांधकाम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानांच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. शिवाय झाराप येथे सिंधू स्वाध्याय संस्था आणि ठाणे उपकेंद्रामध्ये मुला-मुलींसाठी वसतिगृहांचे बांधकाम करण्याची घोषणा देशमुख यांनी केली.
स्वामीनाथन यांना डी. लिट
अधिसभेच्या बैठकीत हरीत क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना मुंबई विद्यापीठाची अत्यंत मानाची असलेली डी. लिट ही सर्वोच्च पदवी बहाल करण्याविषयीचा ठराव आज अधिसभेत एकमुखाने मंजूर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाने २००२ साली सुप्रसिध्द अर्थशास्त्रज्ज्ञ डॉ.अमर्त्य सेन यांना मानद डी.लिट
ही पदवी बहाल केली होती. (प्रतिनिधी)
२०१६-२०१७ नवीन उपक्रम/योजनांसाठी प्रस्तावित केलेल्या निधीची आकडेवारी
विद्यापीठाचे मल्टी-डायमेन्शनल विकास कार्यक्रमांतर्गत शारीरिक शिक्षणाचे श्रेष्ठत्व केंद्र उभारण्यासाठी, क्रीडा व संरक्षण पुनर्वासनाचे श्रेष्ठत्व केंद्र उभारण्यासाठी, नवीन्यपुर्ण व उद्योगजकत्वाचे श्रेष्ठत्व केंद्र आणि क्रीडा श्रेष्ठत्व केंद्र उभारणीसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यापीठाने सुरू केलेल्या संरक्षित जागेचा विकास उपक्रमासाठी यावेळी पाणथळ जागांसाठी १ कोटी आणि वनस्पती शास्त्र उद्यानासाठी १ कोटी रुपयांची घोषणा कुलगुरुंनी केली.
स्मार्ट गाव योजनेसाठी यावेळी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाची सामाजिक जबाबदारी जपताना स्वच्छ कॉलेज अभियान राबवण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या १६० व्या स्थापना दिवस कार्यक्रमासाठी सुमारे २ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यात चर्चासत्रे व कार्यशाळा आणि प्रकाशने यांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तर माहितीपट व चित्रपटांच्या निर्मितीसाठी ५० लाख आणि भाषणांच्या मालिकांसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
च्तर विद्यापीठ सुधारणा करताना ब्रॅन्डींग अँड पोर्टल डिझाईनिंगसाठी २५ लाख रुपयांची तरतूद आहे. विद्यापीठाचे ब्रिक्स आणि जागतिक विद्यापीठामध्ये रँकिंग सुधारण्यासाठी २० लाख रुपये ठेवण्यात आले आहे.