विनाअनुदानित शाळांनाही मिळणार अनुदान
By Admin | Updated: April 8, 2017 05:02 IST2017-04-08T05:02:54+5:302017-04-08T05:02:54+5:30
शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट २० टक्के अनुदान मंजूर करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला

विनाअनुदानित शाळांनाही मिळणार अनुदान
मुंबई : राज्यात गेल्या १५ वर्षांपासून विनाअनुदानित तत्त्वावर असलेल्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट २० टक्के अनुदान मंजूर करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे १४ जून २०१६पूर्वी अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या १ हजार ६२८ शाळा व २ हजार ४५२ तुकड्यांमधील १९ हजार २४७ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदानाचा लाभ मिळेल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.
विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या शाळा अनुदानासंबंधीची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या वेळी उत्तर देताना तावडे म्हणाले की, शासन निर्णयातील निकषानुसार ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे, हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेनुसार आतापर्यंत १ हजार १७८ शाळांमधील १ हजार ३१६ तुकड्यांची अनुदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
१ व २ जुलै २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत व उर्वरित शाळांना मूल्यांकनात पात्र घोषित करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही सुरू आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही तावडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. (प्रतिनिधी)
>लक्षवेधी सूचना
शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे, विक्रम काळे आदी सदस्यांनी विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या शाळांच्या अनुदानासंबंधीची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.