राज्यपालांच्या भेटीस आलेल्या आजी जेलमध्ये

By Admin | Updated: February 14, 2017 04:05 IST2017-02-14T04:05:24+5:302017-02-14T04:05:24+5:30

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेण्यासाठी आलेल्या ७३ वर्षीय आजींची रवानगी थेट पोलीस कोठडीत करण्याचा प्रताप

In the grandmother's confinement to the governor | राज्यपालांच्या भेटीस आलेल्या आजी जेलमध्ये

राज्यपालांच्या भेटीस आलेल्या आजी जेलमध्ये

जमीर काझी / मुंबई
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेण्यासाठी आलेल्या ७३ वर्षीय आजींची रवानगी थेट पोलीस कोठडीत करण्याचा प्रताप राजभवनाच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसांनी केला आहे. न्यायाच्या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेण्यास आलेल्या या आजीबार्ईंच्या संयमाचा बांध सुटला आणि त्यांची अडवणूक करणाऱ्या पोलीस हवालदारावर संतापात त्यांनी शाई फेकली. हे निमित्त साधत सुरक्षेत असलेल्या पोलिसांनी थेट आजीबार्इंवर कारवाई करत त्यांना कोठडीत धाडले.
आपल्यावरील अन्यायाचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता वर्ध्याहून राज्यपालांना भेटण्यासाठी आलेल्या शिल्पा गुलाबराव पिंगळे (वय ७३, रा. वर्धा) या आजीबाई सुरुवातीला प्रचंड संयमाने वागल्या. पण खाकी वर्दीला काही पाझर फुटेना. यापूर्वी दोनदा राज्यपालांच्या भेटीसाठी येऊनही पोलिसांनी त्यांची भेट होऊ दिली नाही. त्यांना चक्क पिटाळून लावण्यात आले होते. त्यामुळे या आजी बुरखा घालून आल्या होत्या. पण अपॉइंटमेंट नसल्याचे सांगत त्यांना पुन्हा हाकलण्याचा प्रयत्न झाला. त्या वेळी निराश झालेल्या आजीबार्इंनी पिशवीत आणलेली शाई पोलीस हवालदार अंकुश माने यांच्यावर भिरकावली. त्या शाईचा काही भाग माने यांच्या हातावर पडला. ही माहिती त्यांनी तातडीने कंट्रोल रूमला कळविली. त्यानंतर मलबार हिल पोलिसांनी येऊन आजीबार्इंना अटक केली. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला. २२ फेब्रुवारीपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
७३ वर्षीय शिल्पा पिंगळे यांच्या पुतण्या व सुनेला मारहाण करण्यात आली होती. त्याबाबत स्थानिक पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागूनही काहीही कारवाई झाली नाही. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडेही दाद मागितली. त्यासाठी त्या दोनवेळा मंत्रालयातही आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता. मात्र स्वीय साहाय्यकाने निवडणूक असल्याने ते भेटू शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटण्याचे ठरविले. मात्र दोनवेळा राजभवनाच्या प्रवेशद्वारातून सुरक्षारक्षकांनी त्यांना पिटाळून
लावले होते.

Web Title: In the grandmother's confinement to the governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.