ग्रामसभेने दिली सामाजिक कार्यकर्त्याला ‘डॉक्टर’ पदवी!
By Admin | Updated: January 28, 2015 04:44 IST2015-01-28T04:44:25+5:302015-01-28T04:44:25+5:30
ग्रामसभेने गावातील ध्येयवेड्या सामाजिक कार्यकर्त्याला ‘डॉक्टर’ ही पदवी देण्याचा निर्णय घेतला. एखाद्याच्या हातालाच गुण असतो म्हणतात

ग्रामसभेने दिली सामाजिक कार्यकर्त्याला ‘डॉक्टर’ पदवी!
रत्नाकर चटप,नांदाफाटा (जि़ चंद्रपूर)
ग्रामसभेने गावातील ध्येयवेड्या सामाजिक कार्यकर्त्याला ‘डॉक्टर’ ही पदवी देण्याचा निर्णय घेतला. एखाद्याच्या हातालाच गुण असतो म्हणतात. तो रोगाचे अचूक निदान करतो अन् आपल्या हातांनी नि:शुल्क उपचारही करतो. बिबी येथील ग्रामसभेत प्रजासत्ताकदिनी हा अनोखा निर्णय घेण्यात आला.
कोरपना तालुक्यातील बिबी येथील गिरीधर काळे २५ वर्षांपासून मोडलेल्या, लचकलेल्या, तुटलेल्या हाडांवर उपचार करीत आहेत. अचूक निदान करून ते रुग्णांवर नि:शुल्क उपचार करतात. त्यांच्याकडून होणाऱ्या यशस्वी उपचारामुळे विदर्भातीलच नाही, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतून रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येतात.
मागील अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय सांभाळून त्यांनी समाजसेवेचे व्रत जोपासले आहे. यामुळे अनेक सामाजिक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. गावातील सेवार्थ गु्रपच्या युवकांनी काळे यांच्याकडील रुग्णांची नोंद घेणे सुरू केले. गावकऱ्यांनी काळे यांना ‘डॉक्टर’ ही पदवी द्यावी, असे काहींनी सुचविले. त्यानंतर गावकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव घेऊन ‘डॉक्टर’ पदवी दिली आहे. काळे यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून, त्यांच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नाही. मात्र त्यांचे निदान वैद्यकीय पदवी प्राप्त डॉक्टरांनाही मागे टाकेल, असे आहे.