ग्रामपंचायतींचे ४२० डेटा आॅपरेटर निलंबित
By Admin | Updated: November 18, 2014 02:52 IST2014-11-18T02:52:03+5:302014-11-18T02:52:03+5:30
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील २७ हजार डेटा आॅपरेटर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली.

ग्रामपंचायतींचे ४२० डेटा आॅपरेटर निलंबित
उरण : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील २७ हजार डेटा आॅपरेटर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. प्रत्येक तालुक्यातील गटविकास कार्यालयासमोर ठिय्या देण्यात आला. २७ हजार नियुक्त डाटा आॅपरेटर्सनी हक्कांसाठी आंदोलन सुरू केले. मात्र ‘महाआॅनलाइन कंपनी’ने संघटनेच्या विभागप्रमुख, जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष अशा ४२० पदाधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
आंदोलनाची दखल घेऊन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष विशाल चिखलीकर यांनी ही माहिती दिली. कंपनीने निलंबित केलेल्यांमध्ये ६ विभागप्रमुख, ३६ जिल्हाध्यक्ष आणि ३७८ तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत होणारी चर्चा सकारात्मक ठरेल आणि राज्यातील २७ हजार डाटा कर्मचाऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांबाबत सन्मानजनक तोडगा निघेल, असा आशावाद महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष विशाल चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)