ग्रामपंचायती होणार मालामाल
By Admin | Updated: July 11, 2017 00:37 IST2017-07-11T00:37:13+5:302017-07-11T00:37:13+5:30
ग्रामपंचायतीने त्यांच्या हद्दीमधील इमारतीच्या नोंदी राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे करण्याचे काम सुरू आहे.

ग्रामपंचायती होणार मालामाल
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामपंचायतीने त्यांच्या हद्दीमधील इमारतीच्या नोंदी राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे करण्याचे काम सुरू आहे. या इमारतीच्या नोंदीचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. या नोंदीमुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एकट्या हवेली तालुक्यातील गेल्या वर्षी ७२ कोटी घरपट्टी मिळणार होती. मात्र, यंदा नव्याने बांधकामाच्या मोठ्या प्रमाणात नोंदी झाल्या आहेत. त्यामुळे फक्त हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून पुढील वर्षी तब्बल शंभर कोटींची घरपट्टी वसूल होणार आहे.
ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींना गावाच्या हद्दीतील इमारतीचे नोंदी करून कर वसूल करण्याचे अधिकार दिले आहे. जिल्ह्यामध्ये १ हजार ४०७ ग्रामंपचायती आहेत. या ग्रामपंचातीने शंभर टक्के कर वसुली केल्यास ग्रामपंचायत विभागाचे उत्पन्न शंभर कोटीने वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मिळकतीचे सर्वेक्षण करून, नोव्हेंबरपासून कर वसूल करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून दिला होता. मात्र, जिल्हा परिषद निवडणुका आणि इतर कामे असल्याने नोंदी करण्याचे काम संथ गतीने सुरू होते.
या निवडणुकानंतर नोंदीच्या कामांना वेग आला आहे. जवळपास नोंदीचे काम पूर्ण होत आले आहे. शहरालगतच्या गावांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी राहिली. त्यात विनापरवानगी बांधकामांची संख्याही मोठी आहे. कर आकारणी न झाल्यामुळे अनेक ग्रामपंचायतींची आर्थिक घडी विस्कटली होती. मात्र, आता गावाच्या हद्दीतील सर्व इमारतींच्या नोंदी होणार असल्याने, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढणार आहे.
गावच्या ग्रामपंचायत हद्दीतील इमारतीचे नोंदी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या नोंदीनंतर इमारत नोंदी नमुना आठवरून अनधिकृत आणि अधिकृत इमारतीची माहिती मिळणार आहे.
या नोंदीमुळे या ग्रामपंचायतीचे
उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जिल्ह्यातील हवेली, मावळ, मुळशी, खेड, शिरूर, बारामती आणि दौंड या तालुक्यांमध्ये शहरालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले आहेत. यामुळे या तालुक्यातील ग्रामपंचायतीचे उत्पन्न मोठ्या
प्रमाणात वाढणार आहे.
- संदीप कोहिनकर,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग
>जिल्ह्यात २०९ कोटी ६ लाखांची घरपट्टी वसुली : कोहिनकर
राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायत हद्दीमधील इमारतीच्या नोंदी करणे आणि करवसुलीचे काम सुरू केले आहे. या वर्षी जिल्ह्यातील १ हजार ४०७ ग्रामपंचायतींमधून २५० कोटी वसुली करण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी आजअखेर २०९ कोटी ६ लाख रुपयांची घरपट्टी वसुली झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली.
राज्य शासनाने ग्रामपंचायतीकडून एक वर्षापासून करवसुली करण्याचे आदेश स्थगित केले होते. तसेच पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतींकडून दिली जाणारी बांधकामे परवानगी आणि बांधकामांच्या नोंदी करण्याचे अधिकार गोठवणारे आदेश यापूर्वी काढण्यात आले होते. या आदेशांमुळे ग्रामपंचायत हद्दीतील कोणत्याही बांधकामाची नोंद झालेली नाही.
शहरालगतच्या गावांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी राहिली. त्यात विनापरवानगी बांधकामांची संख्याही मोठी आहे. या इमारतींच्या नोंदी नमुना ८ मध्ये न झाल्याने त्यांच्याकडून कोणत्याही
प्रकारची कर आकारणी करणे ग्रामपंचायतीला शक्य झाले
नाही. त्याउलट या इमारतींमध्ये सदनिकाधारक राहण्यास
आल्याने त्यांना द्याव्या लागणाऱ्या सुविधांचा बोजा ग्रामपंचायतींवर पडत राहिला.
कर आकारणी न झाल्यामुळे अनेक ग्रामपंचायतींची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे या करपात्र इमारतींच्या नोंदी ग्रामपंचायतीकडील नमुना आठमध्ये करण्यास पुन्हा परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने गावाच्या हद्दीतील इमारतीच्या नोंदी करून करवसुली करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना दिले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मिळकतीचे सर्वेक्षण करून, कर वसूल करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून दिला होता. त्यानुसार ग्रामसेवकांनी मागील थकबाकी तसेच चालू घरपट्टी वसूल केली जात आहे.
याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीकडून मागील वर्षीची ८८ कोटी ११ लाख १८ हजार कराची वसुली करणे बाकी आहे. तसेच या वर्षी १६२ कोटी १५ लाखांची घरपट्टी अशी एकूण २५० कोटी घरपट्टीची वसुली करण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी आत्तापर्यंत २०९ कोटी ६ लाख ५६ हजार करवसुली झाली आहे. जवळपास ८३ टक्के घरपट्टी वसुली झाली.
>सर्वांत जास्त हवेली तालुक्यातून घरपट्टी वसूल : हवेली ५७ कोटी ४ लाख, मुळशी ३० कोटी ७९ लाख,
शिरूर २४ कोटी ८९ लाख ६ हजार, खेड २३ कोटी २७ लाख ३४ हजार, मावळ २१ कोटी ८४ लाख ५२ हजार, बारामती १२ कोटी ९७ लाख ८५ हजार, जुन्नर १० कोटी ३८ लाख, दौंड ८ कोटी १२ लाख ७७ हजार, इंदापूर ५ कोटी ८९ लाख, भोर ४ कोटी ७० लाख २६ हजार, आंबेगाव ३ कोटी ८४ लाख ७४ हजार, पुरंदर ३ कोटी ७६ लाख ४३ हजार, वेल्हा १ कोटी ५२ लाख सर्वांत जास्त हवेली तालुक्यातून घरपट्टी वसूल झाली आहे.