मराठवाड्यातून आलेल्या दुष्काळग्रस्तांना धान्य वाटप
By Admin | Updated: October 8, 2015 02:09 IST2015-10-08T02:09:51+5:302015-10-08T02:09:51+5:30
दुष्काळामुळे स्थलांतर करून तुर्भे येथे अलेल्या कुटुंबांना विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने प्रसिध्द केलेल्या वृत्तांची दखल घेतली गेली आहे

मराठवाड्यातून आलेल्या दुष्काळग्रस्तांना धान्य वाटप
- प्राची सोनवणे, नवी मुंबई
दुष्काळामुळे स्थलांतर करून तुर्भे येथे अलेल्या कुटुंबांना विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने प्रसिध्द केलेल्या वृत्तांची दखल घेतली गेली आहे. बुधवारी ठाणे महापालिकेतील नगरसेविका बिंदू महेंद्र मढवी यांच्या पुढाकाराने धान्याचे वाटप करण्यात आले.
विदर्भ, मराठवाडा येथून आलेल्या दुष्काळग्रस्तांनी नवी मुंबईतील तुर्भे उड्डाणपुलाखाली आसरा घेतला आहे. प्यायला पाणी नाही, हाताला काम नाही, खायला अन्न नाही अशा अवस्थेत त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. बुधवारी ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका बिंदू महेंद्र मढवी यांच्या पुढाकाराने या स्थलांतरित कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यात आले.
मढवी या दुष्काळग्रस्तांना धान्य उपलब्ध करण्यासाठी मागील महिनाभर प्रयत्नशील होत्या. अखेर महेंद्र मढवी, प्रतीक पवार, अमोल काळे, सुजित पवार, अमित पाटील या कार्यकर्त्यांनी सामूहिक प्रयत्नांतून २00 किलो तांदूळ व ४0 किलो गहू खरेदी करून आज त्याचे वाटप केले.
आघाडी सरकारने केली होती मदत
-२०१२ मध्ये राज्यात भीषण दुष्काळ पडल्यानंतर हजारो दुष्काळग्रस्त मुंबई, नवी मुंबईत आले होते. तत्कालीन काँगे्रस, राष्ट्रवादी आघाडी सरकारने दुष्काळग्रस्तांना तात्पुरत्या शिधापत्रिका देऊन स्वस्त दरात धान्य मिळवून दिले होते.
-तत्कालीन अन्न व पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी नवी मुंबईतील तुर्भे उड्डाणपुलाखाली स्वत:च्या हाताने धान्य वितरणाची सुरवात केली होती. जवळपास तीन महिने दुष्काळग्रस्तांना धान्य उपलब्ध करून दिले होते.
मिळालेल्या धान्यातून आठवडाभराचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला खरा, पण त्यानंतर आम्ही पोट भरायचे तरी कसे यावर कायमस्वरूपी तोडगा निघायला हवा. स्वत:चे शेत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळते. पण दुसऱ्याच्या शेतावर काम करून पोट भरणाऱ्यांनी संसाराचा गाडा चालवायचा तरी कसा, असा सवाल वाशिम जिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या महादेव हटकर यांनी व्यक्त केली.