दादूस... चल शर्यतीला जाऊ...
By Admin | Updated: March 2, 2017 04:41 IST2017-03-02T04:41:30+5:302017-03-02T04:41:30+5:30
मुंबईत पहिल्यांदाच रंगणाऱ्या पॉवरबोट शर्यतीच्या थराराची उत्सुकता शिगेला पोहोचली

दादूस... चल शर्यतीला जाऊ...
मुंबई : मुंबईत पहिल्यांदाच रंगणाऱ्या पॉवरबोट शर्यतीच्या थराराची उत्सुकता शिगेला पोहोचली असली, तरी मुंबईचा खरा भूमिपुत्र म्हणून ओळखला जाणारा कोळी समाज मात्र स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याने या स्पर्धेला आणखी रंग चढला आहे. एकीकडे तुफानी वेगाने समुद्रावर झेपावणाऱ्या पॉवरबोट सोबतच दुसरीकडे पारंपरिक कोळी होड्यांची शर्यत लक्षवेधी ठरेल.
मरिन ड्राइव्हवर ३ ते ५ मार्चदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी आयोजकांनी शर्यतीचा मार्ग आखला असला तरी, यासाठी त्यांना मदत झाली ती कोळ्यांच्या मुलांची. मुंबई समुद्राची पुरेपूर माहिती असलेल्या स्थानिक कोळ्यांच्या मदतीने आयोजकांनी सर्व तयारी केली. त्याचवेळी, मुंबईच्या या आद्य रहिवाशांनाही स्पर्धेत सहभागी करून घेण्याची कल्पना पुढे आल्याचे स्पर्धा आयोजक विवेक सिंग यांनी सांगितले.
मुंबईतील एकूण ८ कोळीवाड्यांचा सहभाग या शर्यतीमध्ये असून, प्रत्येक कोळीवाड्यांच्या ५ होड्या शर्यतीत सहभागी होतील. या विशेष शर्यतीमध्ये स्पर्धकांना कमी वेळेत आपली होडी वल्हवून अंतिम रेषा पार करायची आहे. या शर्यतीमध्ये उत्तन, मालवणी, वर्सोवा, माहीम, वरळी, गिरगाव, कुलाबा आणि कफ परेड या ८ कोळीवाड्यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे, शर्यतीव्यतिरिक्त मच्छीमारी करणाऱ्या बोटींची सजावट स्पर्धाही या वेळी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कोळी समाजातील पुरुषांसह महिला वर्गाचा मोठा सहभाग असेल. होड्यांच्या शर्यतीतील विजेत्यांची घसघशीत कमाई होणार असून, प्रथम क्रमांकास १ लाख, द्वितीय क्रमांकास ६० हजार आणि तृतीय क्रमांकास ४० हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तसेच, बोट सजावटी स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
स्पर्धक म्हणून कस लागणार
नेहमी व्यवसायासाठी समुद्रावर स्वार होणारा दर्याचा राजा, या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्पर्धक म्हणून स्वार होईल. यामुळे नक्कीच त्यांच्यापुढे मोठ आव्हान असेल. ‘घरच्या मैदानावर’ ही शर्यत रंगत असली तरी, वेगात वल्हवत पुढे जायचे असल्याने प्रत्येक स्पर्धक ‘राजा’चा या शर्यतीच्या निमित्ताने कस लागणार आहे.
पहिल्यांदाच कोळी समाजासाठी अशी होड्यांची स्पर्धा होत असल्याचा खूप मोठा आनंद आहे. जागतिक पॉवरबोट स्पर्धेत आम्हाला सहभागी करून कोळी संस्कृती जगासमोर आणण्याची संधी दिल्याबद्दल स्पर्धा आयोजकांचे खूप आभार.
- रोहिदास कोळी,
कोळी महासंघ दक्षिण मुंबई विभाग, अध्यक्ष
अशी रंगणार स्पर्धा : प्रत्येक कोळीवाड्याच्या
५ होड्या शर्यतीत सहभागी होतील. ही शर्यत रिले पद्धतीने होईल. सुरुवातीच्या स्थानापासून प्रत्येकी २०० मीटर अंतरावर होड्या आपल्या संघाचे झेंडे घेऊन उभ्या राहतील.
४० मिनिटांमध्ये रिले पद्धतीने सर्वप्रथम अंतिम रेषा पार करणारा संघ विजयी होईल.