गोविंदराव आदिक अनंतात विलीन
By Admin | Updated: June 8, 2015 01:31 IST2015-06-08T01:31:28+5:302015-06-08T01:31:28+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक (७६) रविवारी अनंतात विलीन झाले.

गोविंदराव आदिक अनंतात विलीन
श्रीरामपूर (जि़अहमदनगर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक (७६) रविवारी अनंतात विलीन झाले. मुंबईतील खासगी रूग्णालयात शनिवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते़ श्रीरामपूरमध्ये रविवारी सायंकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिली.
रविवारी भल्या पहाटे त्यांचे पार्थिव श्रीरामपूर येथे आणण्यात आले. ते राहत असलेल्या हरेगाव बंगल्यात सकाळपासून राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळलेले त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. माजी मंत्री छगन भुजबळ व पारनेरचे आमदार विजय औटी यांनी अंत्यदर्शन घेतले. याठिकाणी पोलिसांनी ‘संगीन शस्त्र’ करून मानवंदना दिली. आझाद मैदानातून पार्थिव बॅरिस्टर रामराव आदिक पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आणल्यानंतर तेथे अहमदनगर, नाशिक, औरंगाबादसह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या त्यांच्या समर्थकांनी अंत्यदर्शन घेतले. सजविलेल्या चौथऱ्यावर आदिक यांच्या पार्थिवावर त्यांचे चिरंजीव अविनाश यांनी अंत्यसंस्कार केले. याप्रसंगी पत्नी पुष्पलता उर्फ नानी, सून अनुपमा, कन्या सुजाता, अनुराधा, अंजली, जावई, नातवांसह जनसागर लोटला होता. (प्रतिनिधी)
दिलदार माणूस!
गोविंदराव हे माझे चांगले मित्र होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याशी आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. राज्यसभेत आम्ही एकत्र असताना साहित्य, कला, संस्कृती अशा राजकारणापलिकडील विषयांवर आमची नेहमी चर्चा होत असे. एक कलासक्त आणि उमद्या मनाचा राजकारणी आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. -विजय दर्डा, राज्यसभा सदस्य आणि लोकमत मीडियाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन