मुंबई : गोकुळाष्टमीली दहिहंडीला १०-१२ पेक्षाही जास्त मानवी थर लावले जातात. यावेळी पडून अनेक गोविंदा जखमी होतात, जायबंदी होतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पैसे देखील खुप लागतात. राज्य सरकारने हा खर्च उचलला आहे. राज्यातील दीड लाख गोविंदांचा विमा उतरविण्यात येणार आहे.
गोविंदांचा विमा काढण्यासाठी प्रत्येक गोविंदामागे द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने ७५/- दराने विमा संरक्षण देण्याचे मान्य केले आहे. यानुसार महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन, अंधेरी (पूर्व) या संस्थेशी समन्वय साधून विमा उतरविणे आणि विम्याचा कालावधी ठरविण्यासाठी उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई यांना प्राधिकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. क्रीडा विकास निधीतून रु.१,१२,५०,००० निधी देण्यात येणार आहे. यानुसार तातडीने विमा उतरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी १.२५ लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मात्र, काही गोविंदा त्यापासून वंचित राहिले. यात आता आणखी २५ हजार गोविंदांची भर पडणार आहे.