गोविंदांनी ‘थर’ गाठलाच!

By Admin | Updated: September 7, 2015 02:17 IST2015-09-07T02:17:46+5:302015-09-07T02:17:46+5:30

‘गोविंदा रे गोपाळा’चा जल्लोष करत शहर-उपनगरातील गोविंदा पथकांनी सररास सात, आठ आणि ठाण्यात नऊ थर रचून न्यायालयाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवले.

Govind reached the 'Thar'! | गोविंदांनी ‘थर’ गाठलाच!

गोविंदांनी ‘थर’ गाठलाच!

मुंबई : ‘गोविंदा रे गोपाळा’चा जल्लोष करत शहर-उपनगरातील गोविंदा पथकांनी सररास सात, आठ आणि ठाण्यात नऊ थर रचून न्यायालयाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवले. ‘एक्क्या’साठी सररासपणे बालगोविंदांचा सहभाग दिसून आला. आयोजकांनीही न्यायालयाच्या निर्बंधांकडे कानाडोळा करत सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली नसल्याचे दिसून आले. उत्साहाच्या भरात मात्र मुंबई व उपनगरांमध्ये शंभराहून अधिक गोविंदा जखमी झाले आणि भिवंडी येथे एका गोविंदाचा मृत्यू झाला.
दुष्काळी परिस्थिती आणि हायकोर्टाने घातलेल्या निर्बंधांमुळे मुंबई आणि ठाण्यातील अनेक प्रतिष्ठित दहीहंड्या रद्द झाल्या होत्या. त्यामुळे शहर-उपनगरातील नामांकित गोविंदा पथकांनी गल्लीबोळांतील आयोजनांना प्राधान्य दिले. शहर-उपनगरातील काही आयोजनांच्या ठिकाणी न्यायालयाचे नियम सररास धाब्यावर बसवून २० फुटांपेक्षा जास्त उंचीचे थर लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण दिवसभर ट्रकमध्ये खचाखच बसलेले गोविंदा आणि दुचाकी वाहनांचे मोठमोठे थवे शहरात फिरताना दिसून आले.

एका गोविंदाचा मृत्यू; १२९ जखमी
दहीहंडी बांधताना भिवंडीत अंबाडीजवळील दिघाशी येथे गणेश पाटील या गोविंदाचा मृत्यू झाला. उत्सव साजरा करताना सुरक्षेची काळजी घेऊ, असे आश्वासन मंडळ आणि आयोजकांनी दिले असतानाही दिवसभरात १२९ गोविंदा जखमी झाले; याशिवाय ठाण्यात १०पेक्षा अधिक गोविंदा जखमी झाले.

दादरच्या आयडियल परिसरातील हंडी ठिकाणी जय हनुमान गोविंदा पथकाने आठ थर रचले तर साई दत्त मित्र मंडळाच्या महिला पथकाने ही हंडी फोडली. आठ थर लावल्याने आयडियलचे आयोजक वादात सापडले आहेत. यासंदर्भात दहीहंडीविरोधात न्यायालयात याचिका करणाऱ्या स्वाती पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला.

दहीहंडी उत्सवात बोलबाला असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आयोजकांनी माघार घेतल्याने शहर-उपनगरांत केवळ सेना भाजपाच्या हंड्यांचा ‘आवाज’ ऐकू आला. मात्र आयोजनांमध्ये न्यायालयाचे निर्बंध सरसकट मोडण्यात आले. त्यामुळे सत्तेत असलेले सेना-भाजपा त्यांच्याशी संबंधित आयोजकांवर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

कोर्टाचे निर्बंध आणि मोठ्या आयोजकांच्या माघारीनंतरही गोविंदांचा उत्साह मात्र कमी झालेला नव्हता.

Web Title: Govind reached the 'Thar'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.