गोविंद पानसरे हत्येचे धागेदोरे मिळाले
By Admin | Updated: June 7, 2015 03:14 IST2015-06-07T03:14:39+5:302015-06-07T03:14:39+5:30
ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून, आम्ही लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू, असा विश्वास अतिरिक्त पोलीस महासंचालक

गोविंद पानसरे हत्येचे धागेदोरे मिळाले
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून, आम्ही लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू, असा विश्वास अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) व विशेष तपास पथकाचे प्रमुख संजयकुमार यांनी शनिवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला. त्यांनी दोन मारेकऱ्यांची प्रत्येकी चार रेखाचित्रे व घटनास्थळाचे सीसीटीव्ही फूटेजही उपलब्ध करून दिले. त्यांच्यावरील हल्ला कौटुंबिक वाद, टोल आंदोलन की सनातनी प्रवृत्तींकडून झाला असावा, या सर्व शक्यतांवर पोलीस आजही काम करीत असून, त्यांतील कोणतीच शक्यता नाकारलेली नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. संजयकुमार दोन दिवस कोल्हापुरात आहेत. शुक्रवारी त्यांनी तपास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत दिवसभर बैठका घेतल्या. सायंकाळी पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांच्याशी पाऊण तास चर्चा केली़ त्यानंतर या सर्व तपासाची माहिती त्यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. संजयकुमार म्हणाले, ‘पानसरे हल्ल्याला तीन महिने व विशेष तपास पथक नियुक्त होऊन महिना झाला; परंतु तरीही आम्ही अजूनही कोणत्याही ठाम निष्कर्षापर्यंत आलेलो नाही; परंतु महत्त्वाचे दोन-तीन दुवे हाती आले असून, त्यावर आम्ही काम करीत आहोत. त्यात यशस्वी झाल्यास गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे; परंतु हे काम एक-दोन दिवसांत होण्यासारखे नाही. तपासासाठी आता सात ते आठ पथके तयार केली आहेत. ती प्रत्येक मुद्द्यावर काम करीत आहेत. पानसरे यांच्यावर हल्ला होण्यापूर्वी हल्लेखोर त्याच परिसरात दोन तास फिरत होते, असे तपासात स्पष्ट होत आहे़ सरस्वती चुणेकर विद्यालयातून जे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, त्याची तपासणी करण्यासाठी विविध संस्थांची मदत घेण्यात येत आहे़ फुटेजमध्ये सकाळी ७ वा. ५७ मिनिटांपासून ते ९.२२ वाजेपर्यंत मोटारसायकलवरील हल्लेखोर दोन वेळा फुटेजमध्ये दिसत आहेत. त्याची आम्ही अधिक छाननी करीत आहोत, असे संजयकुमार म्हणाले़
रेखाचित्रे प्रसिद्ध
दोन संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रे पोलिसांनी प्रसिद्धीस दिली आहेत. या छायाचित्रांसोबत केवळ दाढी असलेली रेखाचित्रेही पोलिसांनी प्रसिद्धीस दिली.
मोटारसायकल संशयास्पद...
हल्ल्यानंतर कागल तालुक्यात दूधगंगा नदीमध्ये हीरो होंडा एसएस मोटारसायकल सापडली. ती कोल्हापूर शहरातून चोरीला गेली होती; परंतु चोरीनंतर ती ७ हजार किलोमीटर फिरली आहे.
ती कुठे व कुणी फिरवली, संशयित हल्लेखोरांनीच ती वापरली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. मोटारसायकलची सीट व शॉकअब्सॉर्बर वेगळे आहेत. तशी सीट कोल्हापुरात कुणी करीत नसल्याचे स्पष्ट झाले.