राज्यपालांना झाली घाई!
By Admin | Updated: September 29, 2014 07:49 IST2014-09-29T07:45:31+5:302014-09-29T07:49:32+5:30
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपा आणि शिवसेनेला हंगामी सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले
राज्यपालांना झाली घाई!
मुंबई : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपा आणि शिवसेनेला हंगामी सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना राज्यपालांना एवढी घाई का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर मुख्यमंत्री चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द केला होता. त्याआधीच राज्यातील निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. शिवाय विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला जेमतेम १५-२० दिवस उरले असल्याच्या पार्श्वभूमीवर काळजीवाहू सरकारकडे कारभाराची जबाबदारी सोपविली जाईल, अशी अटकळ राज्यपालांनी चुकीची ठरविली.
राष्ट्रपती राजवटीचा निर्णय होण्यापूर्वी राज्यपालांनी भाजपा आणि शिवसेनेला पत्र देऊन सरकार स्थापण्याचे आमंत्रण दिले होते. राज्यपालांनी असे पत्र दिल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी मान्य केले आहे. या आमंत्रणामागे राजकीय हेतू होता की काय, याचीही चर्चा राजकीय गोटात चवीने सुरू आहे. (विशेष प्रतिनिधी)