घोटाळ्यांची राज्यपालांकडून दखल
By Admin | Updated: June 29, 2015 03:27 IST2015-06-29T03:27:33+5:302015-06-29T03:27:33+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची रविवारी भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केली.

घोटाळ्यांची राज्यपालांकडून दखल
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची रविवारी भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केली. राज्य मंत्रिमंडळातील मातब्बर मंत्र्यांवर होत असलेले बनावट पदव्यांचे व भ्रष्टाचाराचे आरोप, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही बड्या अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई आणि १५ दिवसांनी होणारे पावसाळी अधिवेशन अशा काही प्रमुख मुद्द्यांवर या वेळी उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
फडणवीस यांनी रविवारी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी राज्यपालांची भेट घेतली. २ वाजून ४० मिनिटांनी ते ही भेट संपवून बाहेर पडले. या वेळी केवळ मुख्यमंत्री व राज्यपाल हेच हजर होते. अन्य कुठलाही अधिकारी या वेळी हजर नव्हता. राज्य सरकारमधील शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या पदवीचा वाद निर्माण झाला. तावडे हे शालेय शिक्षण विभागापासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व खात्याचे मंत्री असून त्यांचीच पदवी वादात सापडल्याने सरकारची बेअब्रू झाल्याची भावना शिक्षण क्षेत्रातील काही मंडळींनी राज्यपालांपर्यंत पोहोचवली आहे. राज्यपाल हे कुलपती असल्याने त्यांनी दोन मंत्र्यांच्या पदवी वादाबाबत मुख्यमंत्र्यांकडून सविस्तर माहिती घेतल्याचे समजते.
महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या खात्यात केलेल्या २०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या वादग्रस्त खरेदीचे प्रकरण काँग्रेसने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोहोचवले आहे. यापूर्वी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यासंबंधीचे प्रकरणही याच खात्याकडे चौकशीला गेले होते. तक्रारदार काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी धमक्या दिल्या जात आहेत. यासंदर्भातही राज्यपालांनी चर्चा केल्याचे समजते.
मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी लंडनमध्ये वादग्रस्त ललित मोदींची घेतलेली भेट व या भेटीची कबुली दिल्यानंतरही सरकारने त्यांना दिलेली क्लीन चिट यासंबंधातही उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झालेली कारवाई याबाबतही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांशी चर्चा केल्याचे कळते. या घोटाळ्यात अडकलेले व निलंबनाची कारवाई झालेले माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या नियुक्तीबाबतही राज्यपालांनी माहिती घेतल्याचे कळते.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १५ दिवसांवर आले असून, या अधिवेशनात सादर होणारी नवी विधेयके व सध्याच्या अध्यादेशांना विधेयक स्वरूपात मंजुरी घेणे यावर बैठकीत विचारविमर्श केला
गेला. (विशेष प्रतिनिधी)
मुख्यमंत्री अमेरिकावारीवर
मुख्यमंत्री सोमवारपासून आठवडाभराच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक आणणे हा त्यांच्या दौऱ्याचा मुख्य हेतू असल्याने या दौऱ्याची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली. राज्यपालांनी या दौऱ्याकरिता शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय व अन्य अधिकारी सहभागी होणार आहेत.
फडणवीस यांनी रविवारी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी राज्यपालांची भेट घेतली. २ वाजून ४० मिनिटांनी ते ही भेट संपवून बाहेर पडले. या वेळी केवळ मुख्यमंत्री व राज्यपाल हेच हजर होते.