टिवटिव करण्यातच सरकारची आघाडी
By Admin | Updated: October 9, 2015 01:33 IST2015-10-09T01:33:36+5:302015-10-09T01:33:36+5:30
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला येत्या ३१ आॅक्टोंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभराच्या काळातील सरकारचा कारभार दृष्टिहीन असल्याचेच दिसून आले. केवळ
टिवटिव करण्यातच सरकारची आघाडी
मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला येत्या ३१ आॅक्टोंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभराच्या काळातील सरकारचा कारभार दृष्टिहीन असल्याचेच दिसून आले. केवळ टिष्ट्वटरवर टिवटिव करण्यातच सरकारने पहिले वर्ष घालविल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.
तटकरे म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा शब्द देऊनही मागच्या रब्बी व खरीप हंगामासाठी सरकारने नुकसानभरपाई दिली नाही. मुख्यमंत्र्यांकडे वारंवार विनंती करूनही मदत केली नाही. मागच्या वर्षभरात किमान आधारभूत किमतीवर सरकारने किती खरेदी केली, हे सरकारने सांगावे,’ असा सवाल करतानाच ‘दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना जुन्या रोजगार योजनेच्या अंतर्गत मागेल त्याला काम देण्यात यावे,’ असेही तटकरे म्हणाले.
पेट्रोल, डिझेलपासून ते तुरडाळीपर्यंतच्या सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. तुरडाळीचा तुटवडा झाला असताना आम्ही १५० रूपयापर्यंत भाव रोखले होते. युती सरकारने मात्र भाव दोनशेपर्यंत नेऊन ठेवले. इतर राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात कमालीची घट झाली असताना महाराष्ट्रात उलटे घडत आहे. सणासुदीच्या तोंडावर जनतेला महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. जाहिरनाम्यात विकासाचे दृष्टिपत्र मांडणाऱ्या सरकारने दृष्टिहीन कारभार केल्याची टीका तटकरेंनी केली.
राज्यभर करणार आंदोलने
वर्षभरात युती सरकारचे अनेक घोटाळे, गैरव्यवहार चव्हाट्यावर आले. या सर्वांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी २५ ते ३० आॅक्टोबर दरम्यान राज्याच्या सर्व जिल्हा, तालुका स्तरावर आंदोलने करणार आहे, तर ३१ आॅक्टोबर रोजी पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वरळी येथील जांबोरी मैदानावर सरकारच्या गैरकारभाराचा पंचनामा करण्यात येणार आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.