ड्रायव्हरविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी अर्ज करणार सरकारी पक्षाचा युक्तिवाद
By Admin | Updated: April 7, 2015 04:31 IST2015-04-07T04:31:46+5:302015-04-07T04:31:46+5:30
हिट अॅण्ड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानला वाचवण्यासाठी खोटी साक्ष देणारा त्याचा चालक अशोक सिंग याच्याविरोधात गुन्हा नोंदवून कारवाई करावी,

ड्रायव्हरविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी अर्ज करणार सरकारी पक्षाचा युक्तिवाद
मुंबई : हिट अॅण्ड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानला वाचवण्यासाठी खोटी साक्ष देणारा त्याचा चालक अशोक सिंग याच्याविरोधात गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी करणारा अर्ज सत्र न्यायालयात दाखल करणार असल्याचे सरकारी पक्षाने सोमवारी स्पष्ट केले.
ही घटना घडली तेव्हा सलमान गाडी चालवत नव्हता व त्याने हा अपघात केला नसल्याची साक्ष सिंगने गेल्या महिन्यात न्यायालयात दिली. मात्र सलमानच गाडी चालवत होता व त्यानेच हा अपघात केल्याचे सर्व पुरावे सरकारी पक्षाने न्यायालयासमोर ठेवले आहेत. त्यामुळे सिंग हा खोटे बोलून न्यायालयाची दिशाभूल करत आहे. तेव्हा त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी करणारा अर्ज दाखल केला जाणार असल्याचे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात स्पष्ट केले.
वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत सलमानने चौघांना चिरडले व त्यातील एकाचा बळी गेल्याचा सरकारी
पक्षाचा आरोप आहे. याप्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्य वधाचा खटला सुरू आहे. यात दोषी आढळल्यास सलमानला दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. मात्र आपण हा अपघात केलाच नसल्याचा दावा सलमानने केला.
याला बचाव पक्षाचा साक्षीदार म्हणून सिंगने याला दुजोरा दिला आहे. अॅड. घरत यांनी सिंग हा खोटे बोलला असल्याचा युक्तिवाद सोमवारी केला. उद्या मंगळवारीही सरकारी पक्ष याबाबत बाजू मांडणार आहे. (प्रतिनिधी)