संविधानानेच सरकार चालेल : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 05:47 IST2018-10-19T05:47:37+5:302018-10-19T05:47:47+5:30
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानातून जीवनाचा मार्ग दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूलतत्त्वे दिली. पुढील हजार ...
संविधानानेच सरकार चालेल : मुख्यमंत्री
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानातून जीवनाचा मार्ग दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूलतत्त्वे दिली. पुढील हजार वर्षे या संविधानाच्या माध्यमातून व्यक्तीला न्याय मिळेल. आज भारताची जी प्रगती होत आहे त्यामागे संविधान आहे, या संविधानानेच सरकार चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित ६२ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा गुरुवारी दीक्षाभूमीवर पार पडला. या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई होते. मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदी उपस्थित होते. गडकरी यांनी केंद्र सरकार बुद्धिस्ट सर्किट व धर्मयात्रा योजनेंतर्गत १० हजार कोटी रुपयांचे रस्ते बनवत असल्याचे सांगितले. रामदास आठवले म्हणाले, संविधान बदलण्याचा कुठलाही इरादा नाही.
दीक्षाभूमीच्या विकासासाठी १०० कोटी
दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाचा वारसा तयार होण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षी १०० कोटी रुपयांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याचा पहिला हप्ता, ४० कोटींचा धनादेश या सोहळ्यात स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांना दिला. मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याचे काम २०२०पर्यंत पूर्ण करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.