दिल्लीचंं नव्हे, मुंबईतलं सरकार हवं !
By Admin | Updated: October 10, 2014 22:50 IST2014-10-10T22:50:49+5:302014-10-10T22:50:49+5:30
कुडाळ : शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारसभेत अजित पवारांचा ‘कॉँग्रेस-भाजप’वर निशाणा

दिल्लीचंं नव्हे, मुंबईतलं सरकार हवं !
कुडाळ : ‘जनतेने मोठ्या विश्वासाने भाजपला सत्ता दिली. तरीही त्यांना महागाई कमी झाली नाही. कांदा आणि उसाला चांगला भाव त्यांना देता आलेला नाही. मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मारक आहे.
काँॅग्रेस आणि भाजपवाले दिल्लीत बसून महाराष्ट्राचे निर्णय घेतात. आम्ही मात्र, सातारा अथवा मुंबईमध्येच बसून राज्याचे निर्णय घेतो. म्हणूनच राज्यात मुंबईचं सरकार आणा,’ असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ‘सातारा-जावळी’ चे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कुडाळ येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. कुडाळ येथील सभेस शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, शिक्षण सभापती अमित कदम, पंचायत समिती सभापती सुहास गिरी, वसंत मानकुमरे व सुनेत्रा शिंदे आदी उपस्थित होते.
पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप घेत अजित पवार म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी चुकीच्या माहितीवर काही तरी बोलत आहेत. बारामतीमध्ये पाणी नसते तर लोकांनी आम्हाला निवडून दिले असते का? महाराष्ट्र नेहमीच गुजरातपेक्षा पुढे राहिला आहे. देशातील पहिली मोनोरेल महाराष्ट्राने सुरू केली आहे. एवढे असतानादेखील भाजप मात्र ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ अशी जाहिरातबाजी करून महाराष्ट्राची बदनामी करत आहे. आता आम्ही महाराष्ट्राची अशाप्रकारे सुरू असलेली बदनामी कधीच सहन करणार नाही. भाजपवाले आणि नरेंद्र मोदीच शेतकऱ्यांसाठी मारक आहेत.’
अजित पवार यांनी भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘चीनची घुसखोरी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात येथे चीन अध्यक्षांसोबत झोपाळ्यावर बसून अगदी झुलत चहा पीत होते. आता तर भारतीय सीमारेषेवर पाकिस्तानचे हल्ले सुरू असताना मोदी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मग्न आहेत. त्यामुळे आता देशातील १२५ कोटी जनतेने कोणाच्या विश्वासावर सुरक्षित राहायचे,’ असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
‘जिल्हा परिषद निवडणुकीत अपघाताने निवडून आलेल्या संधीसाधूंना तालुक्यातील जनता त्यांची जागा दाखवून देतील,’ अशी टीका शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. शशिकांत शिंदे यांनीही भाषण केले. यावेळी उपसभापती निर्मला कासुर्डे, पंचायत समिती सदस्य मोहन शिंदे, रूपाली वारागडे, जितेंद्र शिंदे, सौरभ शिंदे, मालोजी शिंदे, संगीता चव्हाण, सारिका सकपाळ, कविता धनावडे, जयदीप शिंदे, कांचन साळुंखे, चंद्रकांत जाधव, प्रवीण देशमाने, वसंत मानकुमरे आदी उपस्थित होते. डॉ. सुरेश शेडगे यांनी प्रास्ताविक केले. अमित कदम यांनी आभार मानले.
राष्ट्रवादीच्या सभामंचकावर ‘रिपाइं’चे पदाधिकारी
राष्ट्रवादीचे ‘सातारा-जावळी’चे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ झालेल्या अजित पवारांच्या सभामंचकावर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपचे उमेदवार जातीयवादी असल्याचा आरोप करत ‘रिपाइं’चे तालुकाध्यक्ष संजय गाडे यांनी विधानसभेला राष्ट्रवादीबरोबर राहणार असल्याची घोषणा केली.