सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी
By Admin | Updated: May 31, 2015 01:52 IST2015-05-31T01:52:54+5:302015-05-31T01:52:54+5:30
मराठवाडा दुष्काळात होरपळत असून, या भागातील शेतकरी देशोधडीला लागला आहे़ आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने कर्जमाफी द्यावी,

सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी
औरंगाबाद : मराठवाडा दुष्काळात होरपळत असून, या भागातील शेतकरी देशोधडीला लागला आहे़ आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने कर्जमाफी द्यावी, खरिपाच्या पेरणीसाठी तसेच व्याजातही सवलत द्यावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शनिवारी केली़ अन्यथा शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला़
शरद पवार हे तीन दिवस मराठवाड्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असून, शनिवारी औरंगाबाद जिल्ह्णातील चित्ते पिंपळगाव येथून या दौऱ्याची सुरुवात झाली़ त्यांनी जालना जिल्ह्णाच्या बदनापूर तालुक्यातील वाकुळणी व अंबड तालुक्यातील जामखेड या दुष्काळी गावांचा दौरा केला़ पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या़ पवार म्हणाले, टंचाई परिस्थिती आवाक्यात असेल, तर शेतकरी स्वत:च काहीतरी मार्ग काढत असतो. मात्र, यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे सरकारने मदत करावी़
मागील सरकारच्या काळात आपण केंद्रात कृषिमंत्री असताना डॉ. मनमोहन सिंग यांच्या मदतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संकटकाळात तातडीने मदत केली. आताचे सरकार शहरी भागाचे आहे. मला सरकारमधील एक माणूस भेटला. तो म्हणतो की, आम्हाला शहरातील मतदारांनी निवडून दिले आहे. शहरी भागात महागाई वाढू नये, असे प्रयत्न असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची दखल न घेणाऱ्या सरकारविरोधात रस्त्यावर यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
नवा गडी पाहा
मागच्या दुष्काळाच्या वेळी आम्ही शेतकऱ्यांना खूप मदत केली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगली किंमत दिली. तरीही नंतर तुम्ही ‘नवा गडी’ निवडला. आता नवा गडी कशी मदत करतो त्याची वाट पाहा. आता तुम्ही त्याची वाट पाहता की तो तुमची वाट पाहतोय ते मला नाही माहीत, असे सांगत पवार यांनी सरकारला मिश्कील चिमटा घेतला.