सरकारने ‘गाई’ सोबतच ‘बाई’च्या आरोग्याकडेही लक्ष द्यावं - चित्रा वाघ
By Admin | Updated: June 16, 2017 14:00 IST2017-06-16T14:00:46+5:302017-06-16T14:00:46+5:30
सरकारने गाईंसोबत देशातील बाईंच्या आरोग्याकडेही जरा लक्ष द्यावे असा टोला राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सरकारला लगावला आहे

सरकारने ‘गाई’ सोबतच ‘बाई’च्या आरोग्याकडेही लक्ष द्यावं - चित्रा वाघ
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - सरकारने गाईंसोबत देशातील बाईंच्या आरोग्याकडेही जरा लक्ष द्यावे असा टोला राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सरकारला लगावला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अजेंड्यावर सध्या फक्त गाईचाच विषय आहे. सरकारच्या दृष्टीने देशातील महिलांच्या आरोग्याचा विषय कुठे आहे ? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेच्या असलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सवर केंद्र सरकारने १२ टक्के जीएसटी कर लागू केल्याबद्दल त्यांनी सरकारचा निषेध केला. "जीएसटीतून सॅनिटरी नॅपकीन्स वगळावेत अशी मागणी आम्ही वांरवांर राज्य सरकारकडे केली, सॅनिटरी पॅड करमुक्त व्हावेत यासाठी स्वाक्षरी मोहीम मुंबईत राबवली व राज्याच्या अर्थमंत्र्यांना देखील याचे निवेदन दिले. परंतु तरीदेखील महिलांच्या आरोग्याचा या प्रश्नाचा सरकारने कुठेही विचार केलेला नाही", असं त्या बोलल्या आहेत.
"मेकअपच्या वस्तू स्वस्त असताना महिलांच्या आरोग्याशी निगडीत वस्तूंवर कर हा कुठला न्याय ? बेटी बचाओ, बेटी बढाओचे नारे देणारे मोदी सरकार जेव्हा महिलांच्या आरोग्याचा प्रश्न आला तेव्हा हात आखडता घेते", अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
"आज ही ८०% महिला सॅनिटरी पॅड परवडत नाही म्हणून वापरत नाही, २०% महिला आजही अनभिज्ञ आहेत. जगामध्ये दरवर्षी २७% महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने मरण पावतात. त्यात भारतीय महिलांचा टक्का मोठा आहे. सॅनिटरी पॅड हे आमच्या चैनीची नाही तर आरोग्यासाठी अतिशय गरजेचं आहे", असं चित्रा वाघ बोलल्या आहेत. सरकारचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला कॉग्रेस राज्यातील ६५ जिल्हा/शहरातून पंतप्रधान व अर्थमंत्री यांना पोस्टाने सॅनिटरी पॅड पाठवत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.