पत्रकारांच्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक!
By Admin | Updated: February 5, 2015 02:21 IST2015-02-05T02:21:04+5:302015-02-05T02:21:04+5:30
पत्रकारांना सामाजिक सुरक्षा असलीच पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे; म्हणूनच पत्रकारांच्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.

पत्रकारांच्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक!
मुख्यमंत्र्यांची ग्वाही : उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांचे वितरण, ‘लोकमत’ची छाप
मुंबई : पत्रकारांना सामाजिक सुरक्षा असलीच पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे; म्हणूनच पत्रकारांच्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. तथापि, पत्रकार सुरक्षा कायद्याच्या तरतुदींविषयी सरकारमध्ये दुमत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. या पुरस्कार वितरण समारंभात लोकमतच्या विविध आवृत्त्यांमधील १२ पत्रकारांना पुरस्कार देण्यात आले. त्यामुळे या समारंभावर लोकमतची छाप होती. ई-माध्यमांनी सरकारपुढे अनेक प्रश्न उभे केले आहेत.
त्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे ही माध्यमेदेखील मुख्य प्रवाहात कशी येतील व त्यावर नियंत्रण कसे येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
माध्यमांनी लोकशाहीवर अंकुश ठेवण्याचे काम केले पाहिजे. माध्यमांचे महत्त्व आपल्याला नक्कीच आहे; मात्र त्यांच्याकडून जबाबदारीची अपेक्षा असल्याचे फडणवीस म्हणाले. सामाजिक मूल्यांची जपणूक जोपर्यंत करत नाही तोपर्यंत पत्रकारिता करताना नैतिक बळ प्राप्त होणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि हे आत्मचिंतन आम्ही आमच्यापासून सुरू करणेही गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
या वेळी लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्काराने लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर, लोकमतचे माजी मुख्य संपादक विजय कुवळेकर आणि नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण जोशी यांना सन्मानित करण्यात आले आहे. शाल, श्रीफळ आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
तीन वर्षांचे पुरस्कार एकाच वेळी देण्यात आले आहेत, याचा अर्थ शासन गतिमान होत आहे, असा निघू शकतो, असे खुमासदार शैलीत सांगत दिनकर रायकर म्हणाले, पत्रकारांनी आपण ज्या राज्यात राहतो, त्या भागाचे हित लक्षात घेऊन बातमीदारी केली पाहिजे. जीवनगौरव पुरस्कार हा उर्वरित आयुष्यात काही तरी गौरवपर करण्यासाठी दिला आहे, असे मानत असल्याचे विजय कुवळेकर म्हणाले.
तत्पूर्वी माहिती खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले तर महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी मनीषा म्हैसकर यांचे आणि संचालक शिवाजी मानकर यांनी चंद्रशेखर ओक यांचे स्वागत केले. मानकर यांनी आभार मानले.
मुख्यमंत्र्यांनी काढला चिमटा
सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, असे आपण काही महिन्यांपूर्वी सतत बोलत होतो. पण मागच्या सरकारने वेळीच निर्णय घेतले असते तर आज आपल्याला तीन वर्षांच्या ४५ विजेत्या पत्रकारांचा सत्कार करण्याचे भाग्य लाभले नसते, असा जोरदार चिमटा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.
पुरस्कार विजेते
लोकमत समाचार; जळगावचे
मुकेश शर्मा यांना बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार, लोकमतचे रत्नागिरी तालुका प्रतिनिधी शिवाजी नामदेव गोरे यांना शि.म. परांजपे पुरस्कार, लोकमत अकोलाचे वरिष्ठ उपसंपादक नरेंद्र बेलसरे यांना लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, लोकमत; नागपूरचे उपसंपादक मिलिंद कीर्ती यांना ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, लोकमत; मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी जमीर काझी यांना आचार्य अत्रे पुरस्कार, लोकमत; नागपूरचे वरिष्ठ उपसंपादक चंद्रशेखर बोबडे यांना ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, लोकमत; नागपूरचे उपसंपादक चंद्रशेखर गिरडकर यांना ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार आणि लोकमत; साताराचे वार्ताहर मोहन मस्कर-पाटील यांना परुळेकर पुरस्कार.