डेंग्यू रुग्णांची सरकारी संख्या प्रत्यक्षाहून २९२ पटीने कमी

By Admin | Updated: October 9, 2014 04:45 IST2014-10-09T04:45:26+5:302014-10-09T04:45:26+5:30

२००६ ते २०१२ या सहा वर्षांत डेंग्युची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सरकारी दफ्तरात नोंद झालेल्या आकडेवारीहून प्रत्यक्षात २८२ पट अधिक होती

Government number of Dengue Patients is 292 lesser than expected | डेंग्यू रुग्णांची सरकारी संख्या प्रत्यक्षाहून २९२ पटीने कमी

डेंग्यू रुग्णांची सरकारी संख्या प्रत्यक्षाहून २९२ पटीने कमी

नवी दिल्ली : २००६ ते २०१२ या सहा वर्षांत डेंग्युची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सरकारी दफ्तरात नोंद झालेल्या आकडेवारीहून प्रत्यक्षात २८२ पट अधिक होती, असा संशोधन अहवाल भारत आणि अमेरिकेतील अभ्यासकांनी ‘अमेरिकन जर्नल आॅफ ट्रॉपिकल मेडिसिन अ‍ॅण्ड हायजीन’ या मान्यवर वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित केला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार याकाळात भारतात दरवर्षी सरासरी २०,४७४ व्यक्तींना डेंग्युची लागण झाली व एकूण १३६ मृत्यू झाले. मात्र प्रत्यक्षात याहून २८२ पटींने अधिक म्हणजे सुमारे ६० लाख लोकांना या काळात डेंग्युने ग्रासले, असा दावा या संशोधन अहवालात करण्यात आला आहे.
डेंग्युच्या या व्यापक प्रसारामुळे या काळात भारतीय अर्थव्यवस्थेवर १.१ अब्ज डॉलरचा आर्थिक बोजा पडला, असा अंदाजही त्यात करण्यात आला आहे. डेंग्युमुळे झालेली ही आर्थिक हानी भारत अंतराळ संशोधनावर जेवढा खर्च करतो त्याच्या बरोबरीची आहे.
वाल्थॅम, मॅसेच्युसेट््स येथील ब्रँडीस विद्यापीठाची स्नेयडर इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ पॉलिसी, नवी दिल्लीतील ‘इनक्लेन ट्र्स्ट इंटरनॅशनल’ आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे मदुराई येथील ‘सेंटर फॉर रीसर्च इन मेडिकल एन्टॉमॉलॉजी’ यांनी मिळून हा संशोधन अहवाल तयार केला आहे.
आतापर्यंत डॉक्टरी तपासणीनंतर स्पष्ट झालेल्या डेंग्युच्या रुग्णांचीच आकडेवारी सरकारी दफ्तरात नोंदविली जात असे. याचे संकलन ‘नॅशनल व्हेक्टर बोर्न डिसीजेस कन्ट्रोल प्रोग्रॅम’ ही केंद्र सरकारची संघटना करते. त्यानुसार २००६ ते २०१२ या काळात भारतात डेंग्युची लागण होण्याचे सरासरी प्रमाण २०,४७४ असून या काळात डेंग्युमुळे झालेले मृत्यू १३६ आहेत.
या संशोधन अहवालाचे प्रमुख लेखक व ब्रँडीस विद्यापीठाचे आरोग्य अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक डोनाल्ड शेपर्ड यांनी सांगितले की, २००६ ते २०१२ या काळात भारतात ‘क्लिनिकल’ तपासणीतून उघड झालेल्या डेंग्युच्या रुग्णांची संख्या प्रत्यक्षात सरकारी आकडेवारीहून ३०० पट अधिक म्हणजे वर्षाला ६० लाख एवढी होती. तरीही आम्ही अंदाज केलेला हा आकडाही वास्तवाहून कमी असावा असे आम्हाला वाटते. याचे कारण असे की, आम्ही यासाठी तमिळनाडू या राज्यास आधार मानून पाहणी केली. तेथे देशाच्या इतर भागांच्या तुलनेत साथीच्या रोगांची निगराणी व नोंदणी व्यवस्था अधिक कार्यक्षम आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Government number of Dengue Patients is 292 lesser than expected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.