सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले
By Admin | Updated: May 31, 2015 01:53 IST2015-05-31T01:53:49+5:302015-05-31T01:53:49+5:30
केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. उसाला, दुधाला दर देता आलेला नाही.
सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले
सातारा : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. उसाला, दुधाला दर देता आलेला नाही. उलट गोहत्या बंदी व जमीन अधिग्रहणसारखा कायदे करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे हे सरकार सुटाबुटाचे व उद्योगपतीधार्जिणे आहे, अशी घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली.
अजित पवार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असताना येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सुरुवातीच्या काळात आम्ही त्यांच्या कामावर कोणतीही टीका केली नाही. कारण आम्ही राज्यात १५ वर्षे व केंद्रात १० वर्षे सत्तेवर होतो. त्यामुळे या सरकारलाही सहा महिने ते एक वर्ष देण्याची गरज होती. मात्र, मोदी सरकारला एक वर्ष झाले तरी समाधानकारक काम करता आलेले नाही. राज्यातील जनतेने फडणवीस सरकारचा सहा महिन्यांचा व मोदी सरकारचा एक वर्षाचा कारभार पाहिला आहे. जी स्वप्ने त्यांनी निवडणुकीवेळी दाखविली ती पूर्ण झालेली नाहीत. उसाच्या दराचा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बिनव्याजी दोन हजार कोटी रुपये देतो, असे सांगितले आहे. मात्र, तेही अद्याप दिलेले नाहीत. केंद्राने साखरेचा बफरस्टॉक करायला पाहिजे होता, तो केलेला नाही. युपीए सरकार असताना एक्स्पोर्ट सबसिडी देणे किंवा ६ हजार ६०० कोटी रुपये बिनव्याजी उपलब्ध करून देणे, असे कोणतेही काम भाजपा सरकारने केलेले नाही, असे सांगून ते म्हणाले, आमचे सरकार असताना शेतकऱ्याला दुधाला २५ ते २६ रुपये दर दिला आहे. आता शेतकऱ्याला १८ ते १९ रुपये दर मिळत आहे. (प्रतिनिधी)
विरोधाभासाचे सरकार
भाजपा म्हणतेय आम्ही जैतापूरचा प्रकल्प करणार, तर शिवसेनेचे नेते म्हणतात, आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही. निवडणुकीपूर्वी भाजपाच्या नेत्यांनी टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. आता केंद्रीय मंत्री अनंत गीते म्हणतात, गोवा-मुुंबई रस्त्याला टोल द्यावाच लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, टोल बंद होऊच शकत नाही. एवढा मोठा विरोधाभास भाजप-शिवसेना तसेच त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांमध्ये असल्याची खिल्लीही पवार यांनी उडविली.