पोलिसांच्या घरांसाठी सरकार प्रयत्नशील

By Admin | Updated: May 16, 2015 03:04 IST2015-05-16T03:04:54+5:302015-05-16T03:04:54+5:30

एकीकडे कामाचा ताण असतानाच पोलिसांना घरांच्याही समस्या भेडसावत आहेत. ताण कमी करण्यासाठी आणि अधिकाधिक पोलिसांना घरे देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे

Government efforts for police houses | पोलिसांच्या घरांसाठी सरकार प्रयत्नशील

पोलिसांच्या घरांसाठी सरकार प्रयत्नशील

नवी मुंबई : एकीकडे कामाचा ताण असतानाच पोलिसांना घरांच्याही समस्या भेडसावत आहेत. ताण कमी करण्यासाठी आणि अधिकाधिक पोलिसांना घरे देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिली. वाढत्या शहरीकरणात उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयाला भेट दिली.
नवी मुंबईचे शहरीकरण, जेएनपीटीचा विस्तार व सिडकोचे भविष्यातील गृहप्रकल्प यामुळे पोलीस आयुक्तालयावरील कामाचा ताण वाढणार आहे. शहराची लोकसंख्या वाढत असताना पोलीस कर्मचारी मात्र अपुरे आहेत. त्यामुळे पोलिसांपुढील समस्या जाणून घेण्यासाठी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. याप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, आयुक्त के.एल. प्रसाद यांच्यासह सर्व उपआयुक्त व पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यांनी पोलिसांच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणी केली. शहरात सीसीटीव्ही कॅमेराचे जाळे पसरवण्यात आले असून, लवकरच आणखी ७५० कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव आहे. गुन्ह्यांची उकल होण्यास हे कॅमेरे उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पोलीस वसाहतींची पडझड झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबांनाच जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. त्यामुळे अधिकाधिक पोलिसांना घरे देण्याचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले. आवश्यक तिथे चार एफएसआय देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पनवेल परिसरात महामार्गालगतचे डान्सबार बंद करण्यासाठी पोलिसांनी तिथे छापे टाकावेत, असेही त्यांनी सुचवले. (प्रतिनिधी)

Web Title: Government efforts for police houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.