सरकारी डॉक्टरांची निवृत्ती ६०व्या वर्षी!
By Admin | Updated: May 27, 2015 02:03 IST2015-05-27T02:03:45+5:302015-05-27T02:03:45+5:30
राज्यातील सुमारे ११ हजार सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार केला आहे.

सरकारी डॉक्टरांची निवृत्ती ६०व्या वर्षी!
यदु जोशी - मुंबई
राज्यातील सुमारे ११ हजार सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार केला आहे. सरकारी नोकरीची डॉक्टरांना अॅलर्जी असल्याने त्यावर इलाज म्हणून हा प्रस्ताव समोर आला असून, लवकरच तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येईल.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी ते राज्याचे आरोग्य संचालक यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. सध्या राज्यात तब्बल ३६ टक्के पदे रिक्त आहेत. सरकारी डॉक्टर होण्यास आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागात जाण्यास नवीन पिढी तयार नाही. अशा परिस्थितीत सरकारी डॉक्टरांचा नोकरीतील आहे तो टक्का टिकविण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी निवृत्तीचे वय वाढविण्याचा उपाय शोधून काढला आहे. वैद्यकीय प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय आघाडी सरकारने ६०वरून ६२ वर्षे तर नव्या सरकारने ६४ वर्षे केले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाला हा न्याय देताना आरोग्य विभागांतर्गतच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८वरून ६० करण्याचा आग्रह विभागाने धरला आहे.
सरकारी नोकरीत जाण्याबाबत डॉक्टरांची अनास्था अलीकडेच प्रकर्षाने समोर आली. एमकेसीएलच्या माध्यमातून विविध पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली. २१०० जणांची निवड झाली; पण त्यातील केवळ ६४३ जणांनी नोकरीत रुजू होण्याबाबत संमती दिली. त्यातील ५२४ एमबीबीएस डॉक्टर होते तर अन्य विशेषज्ञ होते. प्रत्यक्षात २५० जण आतापर्यंत रुजू झाले आहेत. या नियुक्ती उमेदवारांना नियुक्तीचा पर्याय विचारून कौन्सिलिंगद्वारे करण्यात आल्या; तरीही अशी अवस्था आहे. विभागांचा निकष न लावता रिक्त जागा तिथे प्राधान्यभरतीची परवानगी द्यावी, असे प्रयत्न डॉ. दीपक सावंत सध्या करीत आहेत.