शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन शिवसेनेची टीका
By Admin | Updated: August 22, 2015 01:06 IST2015-08-22T01:06:08+5:302015-08-22T01:06:08+5:30
देशातील शेतकऱ्यांबाबत जेवढे काम व्हायला हवे होते तेवढे झालेले नाही, अशी टीका शिवसेना खासदार व प्रवक्ते अरविंद सावंत यांनी केली.

शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन शिवसेनेची टीका
मुंबई : देशातील शेतकऱ्यांबाबत जेवढे काम व्हायला हवे होते तेवढे झालेले नाही, अशी टीका शिवसेना खासदार व प्रवक्ते अरविंद सावंत यांनी केली.
जमीन संपादन कायद्यात शेतकऱ्यांच्या पूर्वसंमतीची अणि सामाजिक परिणामांचा अभ्यास करण्याची तरतूद करण्याची शिवसेनेची मागणी मान्य झाली असल्याचे सावंत यांनी सांगितले. देशात सर्वप्रथम कर्जमुक्तीची मागणी शिवसेनेने केली व तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना ती जनमताच्या दबावाखाली मान्य करावी लागली, असेही ते म्हणाले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने सावंत यांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. सावंत म्हणाले की, पाकिस्तानबरोबर कुठल्याही स्वरूपाची चर्चा करण्यास शिवसेनेचा विरोध कायम आहे.
केंद्रात रालोआ सरकार असताना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी समझोता एक्स्प्रेस सुरू केली तेव्हाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला
विरोध केला होता. भारताबरोबर सौहार्दपूर्ण संबंधाची चर्चा सुरू असतानाच कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी केली होती. त्यामुळे पाकिस्तानशी कुठलीही चर्चा करणे निष्फळ आहे, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)