मुंबई : राज्यभरातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरविण्यासह चांगली सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असा विश्वास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. शिवाय त्यादृष्टीने महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक कार्यक्षमपणे काम करावे, असे आवाहन करत आपल्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. वांद्रे येथील महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत बावनकुळे बोलत होते. सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सौर कृषीपंप, बेरोजगार अभियंत्यांसाठी फिडर योजना, बेरोजगार अभियंत्यांना प्रायोगिक तत्त्वावर विविध कामे देण्याचा निर्णय; इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत. त्यांच्या अंमलबजावणीला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गती द्यावी. त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे ते म्हणाले. ग्राहकांना देण्यात येणारे वीजबिल वाचायला सोपे करणे, नादुरुस्त रोहित्र त्वरित दुरुस्त करण्यासाठी उपविभागीय स्तरावर अद्ययावत ट्रान्सफार्मर भवनाची उभारणी करणे, सरासरी वीजबिल, वीजचोरीवर आळा घालणे, ग्रामीण भागातील तक्रारींचा निपटारा करणे, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वीज जोडणी देणे; इत्यादी उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले. (प्रतिनिधी)
अखंडित वीजपुरवठ्यासाठी शासन कटिबद्ध!
By admin | Updated: November 29, 2015 02:50 IST