गोवंडीत चिमुरडीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या

By Admin | Updated: October 27, 2014 02:20 IST2014-10-27T02:20:49+5:302014-10-27T02:20:49+5:30

घराबाहेर खेळणाऱ्या ११ वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात घडली आहे

Govandit chimuradi rape after murderous murder | गोवंडीत चिमुरडीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या

गोवंडीत चिमुरडीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या

मुंबई : घराबाहेर खेळणाऱ्या ११ वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात घडली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.
शिवाजीनगरातील बैंगनवाडी परिसरात ही चिमुरडी आई-वडील, दोन लहान भावंडं आणि आजीसोबत राहत होती. शनिवारी चार वाजण्याच्या सुमारास ती घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली. बराच वेळ घरी न परतल्याने तिच्या आई-वडिलांनी शेजाऱ्यांकडे तसेच परिसरात तिचा शोध घेतला; मात्र ती कुठेही सापडली नाही. अखेर तिच्या आई-वडिलांनी सायंकाळी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून ती हरवल्याची तक्रार केली. पोलिसांनी देखील घटनेची गंभीर दखल घेत शोधमोहीम सुरू केली. रात्रभर या मुलीचे आई-वडील, नातेवाईक आणि पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र तिचा काहीच पत्ता लागला नाही. रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ काही रहिवासी मॉर्निंग वॉकसाठी आले होते. यातील एका इसमाची उद्यानाजवळच असलेल्या कचराकुंडीकडे नजर गेली. या कचराकुंडीमध्ये एका चटईत काहीतरी गुंडाळल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने ती चटई उघडून पाहिली असता यात या मुलीचा मृतदेह आढळून आला. त्याने तात्काळ ही बाब शिवाजीनगर पोलिसांनी सांगितली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून हा मृतदेह ताब्यात घेतला.
हत्या करणाऱ्या नराधमाने मुलीचे दोन्ही हातपाय दोरीने बांधले होते. तसेच तिच्या तोंडामध्ये कपडा कोंबला होता. पोलिसांनी तात्काळ हा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवून तिच्या आई-वडिलांना याची महिती दिली.
तसेच याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शिवाय या परिसरातील काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे लवकरच यातील आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.

 

Web Title: Govandit chimuradi rape after murderous murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.