आणखी एक प्रत्यक्षदर्शी मिळाला
By Admin | Updated: October 9, 2015 01:27 IST2015-10-09T01:24:48+5:302015-10-09T01:27:35+5:30
पोलिसांचे संरक्षण : तपासाला मिळणार भक्कम पाठबळ

आणखी एक प्रत्यक्षदर्शी मिळाला
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या होताना पाहणारा आणखी एक प्रत्यक्षदर्शी कोल्हापूर पोलिसांना मिळाला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी गुरुवारी सांगितले. त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले असून, त्याच्या संरक्षणाची जबाबदारीही पोलिसांनी घेतली आहे.कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर दि. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळ्या झाडून खुनीहल्ला करण्यात आला होता. त्यानंतर उपचार सुरू असताना गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयावरून पोलिसांनी अटक केलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत कळंबा कारागृहात आहे. बुधवारी त्याची चार प्रत्यक्षदर्शींकडून ओळख परेड झाली. पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे, त्यांची मोलकरीण, शेजारी राहणारी व्यक्ती व शाळकरी मुलगा हे ते प्रत्यक्षदर्शी होते. समीरसह बारा संशयितांना त्यांच्यासमोर उभे केले असता उमा पानसरे, मोलकरीण व शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने येथे तो माणूस उपस्थित नाही, असे सांगितले होते. चौदा वर्षांच्या मुलाने मात्र बारा संशयितांच्या चेहऱ्यांवर नजर फिरवीत समीरवर ती रोखली आणि त्याच्या दिशेने बोट करून ‘हाच तो मारेकरी’ म्हणून ओळखले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पानसरे हत्येच्या घटनेचा आणखी एक प्रत्यक्षदर्शी पोलिसांना मिळाला आहे. त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. १६ फेब्रुवारी ज्यावेळी घटना घडली, यावेळी तो त्याच परिसरात होता. त्याने संपूर्ण घटनाक्रम पाहिला असून पानसरे दाम्पत्यावर गोळ्या झाडतानाही त्याने पाहिल्याचीही माहिती दिली आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. घटना घडल्यानंतर घाबरल्यामुळे तो पुढे आला नव्हता. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने संपूर्ण घटना सांगितली आहे. त्याच्या जिवाला धोका पोहोचू नये यासाठी त्याच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांनी घेतली आहे. या नव्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारामुळे अनेक बाबी उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिसांच्या तपासकामाला बळ मिळणार आहे.
गोविंद पानसरे
हत्या प्रकरण
समीरच्या ब्रेन मॅपिंगवर आज निर्णय
पानसरे हत्याप्रकरणी संशयित आरोपी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला आज, शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या ब्रेन मॅपिंग तपासणीबाबतही यावेळी निर्णय होणार आहे.
संशयित समीर सध्या कळंबा कारागृहात आहे.
त्याची न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला प्रथम वर्ग न्यायाधीश डांगे यांच्यासमोर हजर करण्यात येणार आहे. सुनावणीवेळी ब्रेन मॅपिंग तपासणीबाबत न्यायालयाकडून त्याची संमती विचारण्यात येणार आहे. समीरच्या उत्तरानंतर ब्रेन मॅपिंग तपासणीबाबत न्यायाधीश डांगे निर्णय देणार आहेत. त्यामुळे त्याच्या या सुनावणीकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.