गोऱ्हे, चव्हाण पाठोपाठ मंदा म्हात्रेंनाही अश्लील संदेश
By Admin | Updated: March 2, 2017 05:16 IST2017-03-02T05:16:45+5:302017-03-02T05:16:45+5:30
भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांना देखील जळगावच्या विकृताने अश्लील मेसेज केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे.

गोऱ्हे, चव्हाण पाठोपाठ मंदा म्हात्रेंनाही अश्लील संदेश
मुंबई: शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यासह नवी मुंबईच्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांना देखील जळगावच्या विकृताने अश्लील मेसेज केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. दीपककुमार गुप्ता (४०) असे त्याचे नाव असून २०१५ मध्ये त्याला भाजप आमदार अनिल गोटे यांना धमकाविल्याप्रकरणी धुळे पोलिसांनी अटक केली होती.
शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांना अश्लील तसेच धमकीचे मेसेज येते असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यांनी मुंबई आणि पुण्यात तक्रार दाखल केली होती. मुळात हा तपास सुरु असतानाच मागील आठवड्यात राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनीही विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती समोर आली. त्यानुसार गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला. त्यामुळे विले पार्ले पोलिसांनी सूत्र हलवली. आणि गुप्तमाहितीदार, मोबाईल लोकेशनवरुन आरोपीचा शोध सुरु केला. त्याच तपासात पोलीस जळगावच्या गुप्तापर्यंत पोहचले.
मुंबई पोलिसांनी बुधवारी त्याचा ताबा घेत त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ४ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने नवी मुंबईच्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनाही धमकीचे मेसेज केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याचा ताबा नवी मुंबईचे गुन्हे शाखा घेणार आहे. गुप्ताच्या या विकृतीमुळे राजकीय वर्तुळात आमदारांचा गोंधळ उडाला आहे. २०१५ मध्ये त्याने धुळ्यातील भाजपा आमदार अनिल गोटे यांना देखील अश्लील आणि धमकीचा संदेश त्याने पाठविला होता. याप्रकरणी त्याला धुळे पोलिसांनी अटक केली होती. (प्रतिनिधी)
>कोण आहे गुप्ता?
जळगाव येथील शिवाजी नगर परिसरात दिपक कुमार प्यारेलाल गुप्ता कुटुंबियासोबत राहतो. तो स्वत:ची ओळख माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सांगतो. त्याचपरिसरात कपड्यांच्या दुकानात तो काम करतो. जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरण गुप्ताने उघडकीस आणले होते. त्याप्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सकांसह अनेक डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले होते. याशिवाय वाळू उपशाबाबत प्रशानाने कंत्राटदाराला अत्यल्प दंड आकारल्याप्रकरणी गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीवरुन कंत्राटदराला पाच पट दंड आकारण्यात आला होता. ही रक्कम कोटीच्या घरात होती.याशिवाय प्रत्येक शासकीय कार्यालयात आठवड्यातून एक दिवस सामान्य नागरिकांना फाईल्स उपलब्ध करुन देण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र त्याने यात आमदारांनाच का टार्गेट केले यामागचे गूढ अद्याप कायम आहे. याचा शोध मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखा घेत आहेत.