गोराई होणार ‘पर्यटन हब’
By Admin | Updated: May 24, 2016 06:05 IST2016-05-24T06:05:59+5:302016-05-24T06:05:59+5:30
बोरीवली (प.) गोराई खाडीच्या पलीकडे असलेल्या १९.३२ किलोमीटर क्षेत्रफळावर वसलेल्या गोराई आणि येथील कुलवेम व मनोरी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटन हब म्हणून

गोराई होणार ‘पर्यटन हब’
- मनोहर कुंभेजकर, मुंबई
बोरीवली (प.) गोराई खाडीच्या पलीकडे असलेल्या १९.३२ किलोमीटर क्षेत्रफळावर वसलेल्या गोराई आणि येथील कुलवेम व मनोरी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटन हब म्हणून जाहीर करून येथील विकास आराखड्याला मंजुरी दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या निर्णयाविरोधात येथील सुमारे २० हजार नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी या तीन गावांच्या नागरिकांना विश्वासात न घेता हा एकतर्फी निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बोरीवली पश्चिमेच्या पलीकडे असलेल्या गोराई, कुलवेम आणि मनोरी ही सुमारे २० हजार लोकसंख्या असलेली तीन गावे आणि ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर पालिकेच्या हद्दीतील उत्तनसह इतर चार गावे ही स्वातंत्र्यानंतरही विकासापासून वंचित आहेत. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या प्रयत्नाने २००० साली या तीन गावांना सुमुद्राखालून जलवाहिनी टाकून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. ही बाब सोडली तर मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असूनही या गावांमध्ये पालिकेचे रुग्णालय, रस्ते, बेस्टची बससेवा, शौचालय या सुविधाच पालिकेने उपलब्ध करून दिल्या नाहीत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसची सेवादेखील येथे तुटपुंजी आहे, असे गोराईच्या लुड्स डिसोझा यांनी सांगितले.
गोराई येथील नागरिकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून ६४ एकर जागेवर एस्सेलवर्ल्डची मनोरंजन नगरी आणि पागोडा उभे राहिले. मात्र या तीन गावांचा विकास झाला नाही. आता येथील जैविक विविधता आणि तिवरांचे जंगल नष्ट करून पर्यटन हब आणि करमणूक केंद्र उभारण्यात येणार आहे. परिणामी पर्यावरणाची हानी होणार आहे. शिवाय जैवविविधतेने नटलेला हरित पट्टा नष्ट करून सुमारे पाच किलोमीटरचा कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. मढ-मार्वे-मनोरी आणि गोराई ते खाडीच्या पलीकडे असे दोन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. तर येथील समुद्रकिनारी हॉटेल्स-रिसॉर्ट, बोट राइड, बोटॅनिकल गार्डन इत्यादी अशा पर्यटन आणि मनोरंजन सुविधांचा अंतर्भाव पर्यटन आराखड्यात आहे. त्यामुळे या भागाचा युरोपच्या धर्तीवर विकास करण्याची शासनाची योजना येथील नागरिकांच्या आणि जैवविविधतेच्या मुळावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पर्यटन केंद्राला आम्ही सुरुवातीपासूनच विरोध केला असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे ‘द बॉम्बे इस्ट इंडियन असोसिएशन’ने सुमारे एक हजाराहून हरकती नोंदवल्या आहेत, असे अध्यक्ष अॅड. विव्हियन डिसोझा आणि उपाध्यक्ष अॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले.
२०१३ साली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आघाडी सरकारने येथील स्थानिकांच्या कलेला वाव देण्यासाठी येथे मॉडेल येथील पंचवीस एकर जागेवर ३० कोटी रुपयांची ईस्ट इंडियन व्हिलेज
योजना स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र ही योजना देवेंद्र फडणवीस सरकारने बासनात गुंडाळून आमच्या माथ्यावर येथील पर्यटन नगरी आणि मनोरंजन केंद्र मारल्याचा आरोप पिमेंटा यांनी केला. मनोरी ते वसई येथील तिवरांच्या जंगलाला राष्ट्रीय कांदळवन परिसर म्हणून २००८ साली केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केले होते, अशी माहिती वॉच डॉग फाउंडेशनचे संचालक निकोलस अल्मेडा यांच्यातर्फे देण्यात आली. आता येथील तिवरांचे जंगल नष्ट करण्यात आले तर पूर परिस्थिती निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
पर्यावरणस्नेही प्रकल्प
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तीन वर्षांपूर्वी गोराई, मनोरी आणि उत्तन परिसरात पर्यटन हब उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रकल्पांतर्गत गोराई ते बोरीवली, मनोरी ते अक्सा दरम्यान दोन पुलांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. तर, ४३ चौ.किमी परिसरात विविध पर्यावरणस्नेही प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.
- विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणाऱ्या एमएमआरडीएने जाहीर केल्याप्रमाणे येथे एफएसआय लागू असणार आहे. गावठाणांना १ एफएसआय मिळणार असून हॉटेल-रिसॉर्टसाठी ०.३ एफएसआय देण्याची योजना आहे. तसेच ५ किलोमीटरच्या सागरी मार्गाचाही प्रस्ताव नियोजन आराखड्यात आहे.
विकासाला चालना मिळणार
मनोर-गोराई परिसर मुंबई महापालिकेचा भाग असला तरी तो अद्याप विकासापासून वंचित राहिला आहे. मुख्य भूभागापासून बाजूला असणाऱ्या या परिसराकडे दुर्लक्ष झाले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. आता एमएमआरडीएच्या माध्यमातून येथे पायाभूत विकासाची कामे हाती घेतली जाणार आहेत. शिवाय या भागातील पर्यटन वाढल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे भाजपा प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.