गोपाळकाल्याने आषाढीची सांगता
By Admin | Updated: July 20, 2016 05:40 IST2016-07-20T05:40:23+5:302016-07-20T05:40:23+5:30
‘ज्ञानेश्वर माउली, तुकाराम’च्या गजरात गोपाळपुरात सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता झाली.

गोपाळकाल्याने आषाढीची सांगता
सचिन कांबळे,
पंढरपूर- ‘ज्ञानेश्वर माउली, तुकाराम’च्या गजरात गोपाळपुरात सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता झाली. गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥ या जयघोषात गोपाळपूर दुमदुमून गेले होते.
पालख्यांनी गोपाळकाला गोड केल्यानंतर मानाच्या सात पालख्या श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या. आषाढी वारीच्या सोहळ्यात विठ्ठल दर्शनाची आस पूर्ण झाल्यानंतर, या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. तत्पूर्वी मंदिर समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी संजय तेली यांच्या हस्ते पादुकांचे पूजन व मानाच्या पालख्यांच्या मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
>असे आहे गोपाळपुरचे मंदिर...
गोपाळपुरातील गोपाळकृष्ण मंदिराचे आवार मोठे, प्रशस्त असून भोवती दगडी तटबंदी आहे. सभोवार ओवऱ्या आहेत. येथील पाषाण ५०० वर्षांपूर्वीचे असावेत, असा मूर्तीशास्त्र संशोधकांचा अंदाज आहे. या मंदिराला तीन दरवाजे आहेत. मंदिरात ४२ खोल्या आहेत. मुख्य दरवाजा उंच, भव्य आकर्षक आहे. येथील व्यवस्था गुरव समाजाचे लोक पाहतात. मंदिरातील शिलालेखाचे आधारे इ. च्या १७४४ साली हे कृष्ण मंदिर तळेगावाचे अनंत श्यामजी दाभाडे यांनी बांधले आहे.
जनाबाईचा संसार पाहण्यासाठी गर्दी
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील गोपाळकृष्ण मंदिरातील जनाबाईचा संसार पाहण्यासाठी व दळणाचे जाते फिरवण्यासाठी महिला भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर परिसरात महिला व पुरुष फुगडी खेळत होते. त्याचबरोबर, मंदिराला प्रदक्षिणा मारून माघारी जात होते.